Published on
:
18 Nov 2024, 11:42 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:42 pm
वॉशिंग्टन : माणसाची सोन्यासाठीची ‘गोल्ड रश’ काही कमी झालेली नाही. अशातच बह्मांडात सोन्याचे भांडार सापडले आहे. हे सोन्याचे भांडार म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह सोन्याने भरलेला आहे. या ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये येतील! हे सोनं पृथ्वीवर आणणे शक्य आहे का? जाणून घेऊया.
सध्या जगभरातील संशोधक परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. संशोधक विविध ग्रहांचा अभ्यास करत आहेत. अशातच संशोधकांना एक असा लघुग्रह सापडला आहे जिथे मोठ्या प्रमाणात सोन्यासारखा मौल्यवान धातू आढळून आला. पृथ्वीपेक्षा जास्त सोनं या लघुग्रहावर आहे. संशोधनादरम्यान संशोधकांना हा लघुग्रह आढळला आहे. 17 मार्च 1852 रोजी इटालियन खगोलशास्त्रज्ञ एनिबेल डी गॅस्पॅरिस यांनी या लघुग्रहाचा शोध लावला होता. ‘सायकी- 16’ असे या लघुग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे. हा ग्रह सूर्यमालेतच असून तो सूर्याभोवती फिरत आहे. हा लघुग्रह सूर्याभोवती मंगळ आणि गुरू यांच्या कक्षेमध्ये फिरत आहे. बहुतेक लघुग्रह खडक, बर्फ किंवा या दोघांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मात्र, या लघुग्रहावर मोठ्या प्रमाणात धातूचा साठा आढळला आहे.
निरीक्षणादरम्यान या ग्रहावर प्लॅटिनम, सोने आणि इतर धातू मोठ्या प्रमाणात आहेत. या लघुग्रहाचे आकारमान 226 किलोमीटर एवढंच आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. या लघुग्रहावर एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ‘नासा सायकी’ यान अवकाशात झेपावले. 2026 पर्यंत हे यान ‘16 सायकी गोल्ड प्लॅनेट वर पोहोचणार होते. ऑगस्ट 2029 मध्ये ‘सायकी स्पेसक्राफ्ट’ या सोन्याच्या लघुग्रहावर पोहोचणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नासाचे यान मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करणार आहे. या ग्रहावर एवढं लोह म्हणजे लोखंड आणि इतर मौल्यवान धातू आहेत की ते विकल्यावर 10 हजार क्वाड्रिलीयन पौंड मिळतील. म्हणजेच 10 हजार या संख्येच्या मागं पंधरा शून्य एवढे पैसे मिळतील. याच हिशेबानं पृथ्वीवरील प्रत्येक माणसाच्या वाट्याला 10 हजार कोटी रुपये मिळतील. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किमतीचे सोने असल्याचा दावा केला जात आहे. सायकी- 16 वरील मौल्यवान धातू पृथ्वीवर आणणे सध्या तरी अशक्य आहे. यामुळे संशोधकांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.