Rafael Nadal Retirement : मलागा येथील स्टेडियमवर १० हजारांहून अधिक चाहत्यांच्या उपस्थितीत महान टेनिसपटू राफेल नदाल याने टेनिसमधून निवृत्ती घेतली. (Image source- X)
Published on
:
20 Nov 2024, 9:11 am
Updated on
:
20 Nov 2024, 9:11 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : एका मुलाने स्वप्न पाहिले. ते साध्यही केले. माझ्यासाठी जेतेपद हा फक्त एक आकडा आहे. हे कदाचित लोकांना माहित असेल. लोकांनी मला कारकीर्दीत मिळालेल्या विजेतेपद किंवा पुरस्कारापेक्षा एक चांगली व्यक्ती म्हणून लक्षात ठेवावे, अशा शब्दांमध्ये टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) यांनी आपलं निवृत्तीच्या सामन्यानंतर मनोगत व्यक्त केले. यावेळी नदालबरोबर मलागा येथील स्टेडियमवर उपस्थित १० हजारांहून अधिक चाहतेही भावूक झाले.
राफेल नदाल याने डेव्हिस कपसाठी सामना खेळत आज व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. 38 वर्षीय नदालला आज डेव्हिस कपच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सच्या गेंडशल्पकडून पराभव पत्करावा लागला. नेदरलँड्सने स्पेनचा 2-1 असा पराभव करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे.
अनेकांना दिले यशाचे श्रेय...
मलागा येथे निवृत्तीच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात नदाल म्हणाला की, जोर्का मधील एका छोट्या गावातील मुलगा नशीबवान होतो. कारण मी लहान असताना माझे काका टोनी नदाल यांनी माझ्या गावातच टेनिसचे प्रशिक्षण दिले. माझे एक उत्तम कुटुंब होते ज्यांनी मला प्रत्येक क्षणी साथ दिली. यावेळी त्याने माजी प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे, सेरेना विल्यम्स आणि इतर टेनिस महान आणि सॉकर स्टार्स जसे राऊल आणि आंद्रेस इनिएस्टा यांच्याचेही आभार मानले.
जेतेपदापेक्षा लोकांनी मला एक चांगली व्यक्ती लक्षात ठेवावे
माझ्यासाठी जेतेपद हा फक्त एक आकडा आहे. लोकांनी मला जेतेपदापेक्षाही एक चांगली व्यक्ती, एक मुलगा म्हणून स्मरणात ठेवावे अशी माझी इच्छा आहे. मी व्यावसायिक टेनिसचे जग सोडत आहे आणि वाटेत अनेक चांगले मित्र भेटले. 'मी शांत आहे कारण मला समोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले आहे. माझे एक चांगले कुटुंब आहे जे मला दररोज आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीत मदत करते, अशी कृतज्ञताही त्याने व्यक्त केली. आगामी वर्षांमध्ये टेनिससाठी एक चांगला राजदूत होण्याची आशा करतो, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. यावेळी त्याने जगभरातील चाहत्यांचे आभार मानले.
नदालचा वारसा चिरंतन : अल्काराज
यावेळी स्पेनचा युवा टेनिसपटू अल्काराज म्हणाले की, "नदाल हा जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. खेळाडूला त्याच्याकडून अपेक्षा असलेल्या सर्व गोष्टी त्याने साध्य केल्या आहेत. त्याचा वारसा चिरंतन राहणार आहे. तो टेनिससाठी महान आहे, किमान माझ्यासाठी तो वारसा पुढे चालू ठेवू नये असे वाटणे कठीण आहे. मी फक्त माझे सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करेन. टेनिसमध्ये, स्पेनमध्ये आणि माझ्या आयुष्यात राफा असणे खूप छान आहे. त्याने आपली सर्व शक्ती आपल्या करिअरमध्ये लावली. त्याला निवृत्त होताना पाहून वाईट वाटते; पण आपल्याला ते स्वीकारावे लागेल."