पणजी : येथे बोलताना डॉ. शिवानंद बांदेकर. सोबत अन्य मान्यवर.Pudhari File Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:46 pm
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता मेंदू आणि नाकातील अल्सरवरील शस्त्रक्रिया सोप्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी 10 कोटी रुपये खर्चून एन्डोस्कोपिक यंत्रणा आणली जाणार आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पुढाकार घेऊन स्कल बेज सर्जरी युनिट स्थापन करण्यास परवानगी दिली असल्याचेही ते म्हणाले.
नवीन युनिटसाठी सोमवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बांदेकर बोलत होते. यावेळी गोव्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. पोनराज, डॉ. मार्कंडेय तिवारी, डॉ. साईश उडपी, डॉ. देव पुजारी, डॉ. निखिल शहा, मार्गदर्शक डॉ. अमीन कासीम उपस्थित होते. ते म्हणाले, मेंदूची शस्त्रक्रिया ही खूप किचकट असते. तसेच खुल्या शस्त्रक्रियेत धोकाही मोठा असतो. त्यामुळे आता एन्डोस्कोपिक पद्धतीने सूक्ष्म कॅमेर्यांचा वापर करून शस्त्रक्रिया करता येणार आहे. अशा शस्त्रक्रियेसाठी 10 लाख खर्च येतो. मात्र, गोमंतकीयांसाठी ही शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याचेही ते म्हणाले. एन्डोस्कोपिक पद्धतीने मेंदूच्या शस्त्रक्रिया जगात अनेक ठिकाणी केल्या जातात. आपण गेली 25 वर्षांपेक्षा अधिक काळ अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करीत, असल्याचे डॉ. कासीम म्हणाले.
दरवर्षी सुमारे 100 रुग्ण मेंदूच्या शस्त्रक्रिया होतात. तसेच नाकातील अल्सरचे इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहेचून रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र, आता शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम रहाणार नाही, असे डॉ. पोनराज म्हणाले.