माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. कडुलिंब, हळद, लिंबू आणि आवळा यांचा आहारात वापर करून त्या पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्याचा दावा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. घरगुती उपचारांनी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचं नवज्योतसिंग सिद्धू यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक कर्करोग रुग्ण त्यांच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक उपचार करण्याबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच काय देशातील नामांकित असं कॅन्सर रुग्णावर उपचार करणाऱ्या टाटा मेमोरियेल रुग्णालयातील 200हून अधिक डॉक्टरांनी लोकांना आवाहन करणारं एक पत्र जारी करावं लागलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, माजी क्रिकेटपटू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते आपल्या पत्नीच्या स्तनाच्या कॅन्सरबाबत सांगत आहेत. व्हिडीओतील काही भागात त्यांनी आहाराचा उल्लेख केला आहे. डेअर उत्पादनं आणि साखर खाणं बंद केलं. तसेच उपचारासाठी कडुलिंब आणि हळदीचा वापर आहारात केला. त्याच्या मदतीने कॅन्सर बरा होण्यास मदत झाली. याबाबत डॉक्टरांनी पत्रात लोकांना आवाहन केलं आहे.
डॉक्टरांनी आपल्या आवाहानात्मक पत्रात लिहिलं आहे की, अशा दाव्याबाबत मेडिकल सायन्समध्ये कोणतंही प्रमाण नाही. अशा आयुर्वेदिक उपचारांवर संशोधन सुरु आहे. पण हळद आणि कडुलिंबामुळे कॅन्सर बरा होतो असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कॅन्सरबाबत कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टर आणि कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळीच निदान झाले तर कर्करोग बरा होऊ शकतो.
PSA: Please don’t judge and get fooled by these statements careless of who it comes from. These are unscientific and baseless recommendations. She got country and chemotherapy that were grounds based which is what made her 🤞cancer-free. Not the haldi, neem etc pic.twitter.com/7gDgN1TzZ8
— Pramesh CS (@cspramesh) November 22, 2024
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे (एफएआयएमए) अध्यक्ष डॉ. सुवर्णकार दत्ता म्हणाले की, कॅन्सरच्या उपचाराबाबत चुकीची माहिती घातक ठरू शकते. कडुलिंब आणि हळद या गोष्टीत कॅन्सरविरोधी घटक असतात की नाही याबाबत संशोधन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. कर्करोगाचं योग्यवेळी निदान करा आणि वेळीच उपचार करा. उशीर केल्यास जीवावर देखील बेतू शकतं. सोशल मीडियावर विश्वास न ठेवता कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असंही डॉ. सुवर्णकार दत्ता यांनी सांगितलं.