कणकवली ः मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचार्यांसाठी विद्यामंदिरच्या पटांगणावर सज्ज एसटी बसेस. (छाया ः अनिकेत उचले)
Published on
:
20 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
20 Nov 2024, 1:00 am
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार 20 नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळपासून कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉल येथून 332 मतदान केंद्रांसाठी 20 टेबलांवरून मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच कणकवली कॉलेज परिसर कर्मचार्यांच्या वर्दळीने गजबजून गेला होता. मतदान केंद्रावर साहित्य घेऊन जाण्यासाठी 45 एसटी बसेस, तर 27 जवळच्या केंद्रांवर 22 जीप सोडण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी बस सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 31 हजार 740 मतदार असून, त्यापैकी 1 लाख 14 हजार 379 पुरुष व 1 लाख 17 हजार 359 स्त्री मतदारांचा समावेश आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रमुख दोन पक्षांसह सहा उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण 332 मतदान केंद्रे असून, प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष व इतर तीन मतदान अधिकारी तसेच प्रत्येकी दोन पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत. गावपातळीवर प्रत्येक केंद्रावर एक शिपाई असणार आहे.
कणकवली विधानसभा निवडणुकीसाठी 1397 कर्मचारी, 700 पोलिस कर्मचारी, 107 राखीव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर 47 झोनल अधिकारी व 62 मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 2300 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसहित पोलीस कर्मचारी मिळून प्रत्येकी सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच 50 टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंगने जोडण्यात आली आहेत. ओसरगाव येथील एक मतदान केंद्र हे दिव्यांग कर्मचारी असलेले, तर कलमठ येथील एक केंद्र सखी महिला केंद्र, तर जामसंडे येथील एक केंद्र युवा कर्मचारी केंद्र करण्यात आले आहे.
मंगळवार दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर त्या त्या नियुक्त अधिकारी-कर्मचार्यांनी ताबा घेऊन मतदानासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी सकाळी 7 वा.पासून सायं. 6 वा.पर्यंत मतदानाची वेळ आहे. शनिवार 23 नोव्हेंबर रोजी कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉल येथे मतमोजणी करण्यात येणार आहे.