कराड दक्षिणेत अतुलपर्व; पृथ्वीराज चव्हाणांवर नामुष्कीFile Photo
Published on
:
23 Nov 2024, 10:39 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:39 am
कराड : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यापासून आजवरच्या सर्वच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून मतदान करत विजयी करणार्या सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी तब्बल 38 हजार 835 मतांनी माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव केला आहे. या पराभवामुळे काँग्रेसच्या आजवरच्या एकहाती वर्चस्वाला अक्षरशः सुरूंग लागला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बुधवारी 76.32 टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यात यश येईल असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. तर सुमारे 8 ते 10 हजारांनी विजय मिळेल असा विश्वास भाजपाकडून केला जात होता. शनिवारी प्रत्यक्षात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेतली आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम होती. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना सुमारे 1 लाख 409 मते मिळाली आहेत. तर डॉ. अतुलबाबांना 1 लाख 39 हजार 904 मते मिळाली असून सुमारे 38 हजार 364 मतांनी त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला आहे.
सात दशकांमध्ये प्रथमच पराभव...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागील सात दशकांमध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. मागील दोन विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. तर त्यापूर्वी 1980 च्या दशकापासून सन 2014 पर्यंत स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्ष विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यापूर्वी स्वातंत्र्यापासून 1980 पर्यंत स्व. यशवंतराव मोहिते यांनी सलग सहा काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळविला होता.