महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मतदारसंघावरील निवडणूक शेवटपर्यंत रंजक राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पण अखेरच्या ईव्हीएममध्ये रोहित पवार यांची लीड वाढली आणि त्याना विजयी घोषित करण्यात आलं. रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला. त्यांना एकूण 1,27,676 मते मिळाली, तर राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली. या जागेसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. NOTA ला 601 मते पडली. 2019 च्या निवडणुकीत रोहित पवार पहिल्यांदा विजयी झाले होते. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार आणि कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता.
भाजपचा बालेकिल्ला
2019 च्या निवडणुकीपूर्वी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपला बालेकिल्ला होता. सलग 5 वेळा येथून भाजपने विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत मात्र भाजपचा बालेकिल्ला ढासळला. 1995, 2000 आणि 2005 असे सलग तीन वेळा भाजपचे सदाशिव लोखंडे या जागेवरून विजयी झाले. तर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे येथून विजयी झाले होते.
रोहित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू दिनकरराव गोविंदराव पवार यांचे नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव राजेंद्र पवार आणि आईचे नाव सुनंदा पवार आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे हे सध्याचे विधान परिषद सदस्य आहेत. 2019 पूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंधारण मंत्री होते. 2009 आणि 2014 मध्ये ते सलग दोन वेळा या जागेवरून आमदार राहिले आहेत. त्याचबरोबर या वेळी भाजपला या जागेवर पुनरागमन करण्याची आशा होती. पण रोहित पवार यांनी येथे खूपच कमी फरकाने विजय मिळवला आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष
महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप सध्या 133 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुतीला 231 जागा मिळाल्या आहेत. अनेक जागांचे निकाल जाहीर झाले असून काही जागांचे निकाल येणे अजून बाकी आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडीला फक्त 45 जागा मिळाल्या आहेत.