Published on
:
29 Nov 2024, 6:47 am
Updated on
:
29 Nov 2024, 6:47 am
रियाज देशमुख
महावितरण मार्फत राहुरी मतदार संघात नवे सबस्टेशन, शेतकर्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सौर सबस्टेशन यासह 400 पेक्षा अधिक वीज रोहित्र व कोट्यवधी रुपयांची विकास कामे करूनही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पराभवाचा बसलेला शॉक कार्यकर्त्यांना अजुनही अविश्वसनिय वाटतो आहे. त्यामुळेच एकीकडे शिवाजीराव कर्डिलेंच्या विजयानंतर भाजपामध्ये उत्साह दिसत असताना दुसरीकडे तनपुरेंच्या गोटात मात्र आत्मचिंतन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
राहुरी विधानसभा मतदार संघाचा निकाल धक्कादायक लागला. आ. कर्डिले यांनी विधानसभा निवडणुकीत स्वावलंबी होत मतदार संघात प्रत्येक गावांत कार्यकर्त्यांची नव्याने मोट बांधली. एकीकडे तनपुरे गटाकडे राजकीय नेत्यांची मोठी गर्दी होती. तर कर्डिले यांच्या गोटामध्ये युवक नेत्यांचा भरणा अधिक होता. अनेक जुने जाणते नेते तनपुरे यांना पाठबळ देत असल्याचे चित्र निवडणुकीत होते. राहुरीमध्ये तनपुरेंचे पारडे जड वाटत असताना पाथर्डी, नगर परिसरातही तनपुरेंनी आपले पाय भक्कम रोवल्याचे दिसत होते. अनेक सामाजिक माध्यमातून केलेल्या सर्व्हेतही तनपुरेंची बाजू उजवीच दिसत होती. तसेच राहुरी मतदार संघात झालेल्या सभा असो की दोन्ही गटाचे प्रचार दौरे पाहता तनपुरेंचा बालेकिल्ला मजबूत दिसत होता. वांबोरी येथील बाजार समितीमध्ये झालेली राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या प्रचार सभेमध्ये गर्दीचा उच्चांक दिसला. यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. नीलेश लंके यांनी घेतलेल्या सभेतही तनपुरे गटाची ताकद अधिक असल्याचे दिसून आली. शेवटच्या सांगता सभेतही कर्डिलेंच्या सभेपेक्षा अधिक गर्दी जमा झाल्याने तनपुरे गटाचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसले.
तर, आ. कर्डिले यांनीही मोठ्या नेत्यांच्या सभेपेक्षा आपलेच नियोजन भारी म्हणत मतदार संघात गाठीभेटीला अधिक जोर दिला. ज्या कार्यकर्त्यांचा फोन येईल त्या कार्यकर्त्याला प्रतिसाद देत कर्डिले गटाने संपर्कात आघाडी ठेवली.
दोन्ही गटाच्या प्रचाराच्या सांगता सभेनंतर कर्डिले यांनी आपले राजकीय कसब दाखवून दिले. तनपुरे गटाच्या वाढलेल्या आत्मविश्वासाला छेद देत मतदानापूर्वीच नियोजनबद्ध रणनिती आखली. दोन्ही गटाकडून मतदान जुळवणी सुरू असताना कर्डिले गटाने मात्र सोशल मीडियातून सोडलेला हिंदुत्वाचा बाण तनपुरेंच्या विजयाला अडसर ठरला. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, शेतकर्यांना लाभलेला पीकविमा यासह विविध शासकीय योजनांचे बळ असतानाच हिंदुत्वाचा प्रचार कर्डिलेंच्या पथ्यावर आला.
निवडणूक काळात तनपुरेंच्या नावाचे निर्माण झालेली सुप्त लाट मतदानाच्या दिवशी कोठे ओसरली ते कोणालाच कळाले नाही. इतकेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी राहुरीसह नगर व पाथर्डी परिसरात तनपुरेंची यंत्रणा अधिक जोमात होती. मतदान घडवून आणण्यातही तनपुरे गटाचे नियोजन अधिक दिसत होते. परंतु तनपुरेंच्या मतदान वाहणार्या वाहनात कर्डिलेंचे सारथी बसले होते का? अशी चर्चा मतमोजणीनंतर सुरू झाली आहे. निकालानंतर तनपुरे गटाचा आत्मविश्वासाचा फुगा फुटला. आ. कर्डिलेंच्या छुप्या यंत्रणेने तनपुरेंच्या नियोजनावर पाणी फेरले.
भाजपने पुन्हा राहुरी मतदार संघात आपलेच मताधिक्य असल्याचे दाखवून दिले. निकालानंतर आकडेवारीच्या खेळातच तनपुरे गट अडकल्याचे दिसत आहे. राहुरी परिसर हा तनपुरेंचा बालेकिल्ला असतानाही त्यामध्ये आ. कर्डिलेंनी सुरुंग लावला कसा? याचे कोडे उलगडण्यात तनपुरे गटामध्ये खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.
राहुरी परिसरातून 5 हजारापेक्षा अधिक तर नगर व पाथर्डी परिसरात आपला वरचष्मा दाखविणार्या आ. कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदार संघात तब्बल 34 हजार 487 मतांनी एकतर्फी विजय मिळविला. निकालाच्या धक्कादायक आकडेवारी पाहता तनपुरे गटात मात्र कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.
तनपुरे यांच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष
राहुरी विधानसभा मतदार संघात लाखापेक्षा अधिक मते दिल्याबद्दल माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आभार मेळावा आयोजित केला आहे. राहुरी येथील स्टेशन रोड येथील व्यंकटेश लॉन्स येथे आज शुक्रवारी (दि.29 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 4 वाजता कार्यकर्त्यांचा आभार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांना मतदारांनी 1 लाखापेक्षा अधिक मते दिले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आभार मेळाव्यात तनपुरेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागलेले आहे.या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे नेते तथा मा.आ. प्राजक्तदादा तनपुरे मित्र मंडळाकडून करण्यात आलेले आहे.
युवाफळीची प्रयत्नाला योजनांची जोड
आ. कर्डिले यांनी देवळाली प्रवरेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाणचे राजू शेटे तसेच जि.प. माजी सदस्य धनराज गाडे या त्रिकुटावर विश्वास टाकून राहुरीत रणनिती आखली. यासह महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आरपीआय व संलग्न संघटनांचे पदाधिकार्यांसह मित्र पक्षातील युवा नेत्यांचे प्रयत्न तर शासनाच्या विकास कामाची जोड देत कर्डिलेंनी विजय मिळविला.
प्राजक्त तनपुरे यांची भूमिका महत्वाची
ईव्हीएम मशिनच्या मतगणनेवर शंका कुशंका व्यक्त होत असतानाच प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी शुल्क भरले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष असतानाच तनपुरेंसमोर मतदार संघात कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याचे आव्हान आहे. समर्थकांना आत्मविश्वासाचे बळ देत पुन्हा राजकीय प्रस्थ निर्माण करण्यासाठी तनपुरे यांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार आहे.