कल्याण : विजयी उमेदवार राजेश गोवर्धन मोरे यांन मतमोजणी निरीक्षक संजय कुमार आणि निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.pudhari photo
Published on
:
23 Nov 2024, 3:02 pm
Updated on
:
23 Nov 2024, 3:02 pm
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात प्रत्येक पाच वर्षाने आमदार बदलणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून मनसेला दोनदा, तर शिवसेनेला एकदा यश आले आहे. या मतदार संघातून निवडून आलेला आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नसल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे आमदार बदलाची परंपरा यावेळच्या निवडणुकीतही कायम राहिल्याचे सिद्ध झाले आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील आणि शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर या दोन्ही आजी माजी आमदारांना पराभूत करून शिंदे सेनेचे राजेश मोरे 66 हजार 434 मताधिक्याने निवडून आले.
शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर यांना 69 हजार 561 मते मिळाली. मनसेचे नेते तथा या भागाचे विद्यमान आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे 74 हजार 249 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी 1 लाख 40 हजार 291 मते मिळवून विजय संपादन केला. या निवडणुकीत एकूण 13 उमेदवार रिंगणात उतरले होते. पैकी अपक्ष व इतर उमेदवारांना मिळून 5 हजार 966 मते मिळाली. त्यातील वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांना 3 हजार 306 मते मिळाली. तर 2706 मतदारांनी सगळ्या उमेदवारांना नाकारले. या मतदारांनी नोटाला बटण दाबून आपल्या मनातील नाराजी व्यक्त केली.
खासदार डॉ. शिंदे ठरले गेम चेंजर
या मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेचे राजेश मोरे यांनी 66 हजार 42 मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला आहे. मोरे यांच्या विजयामध्ये खासदार डॉ. शिंदे यांचा मोलाचा वाटा असून कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेने (शिंदे गट) हा एक हाती विजय खेचून आणला आहे. टपाली मतदान पकडून राजेश मोरे यांना मतमोजणीच्या 31 व्या फेरीअंती 1 लाख 40 हजार 685 इतकी मते पडली. मनसेचे राजू पाटील यांना 74 हजार 605 इतकी मते पडली आहेत. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सुभाष भोईर यांना 69 हजार 916 मत पडली आहेत.
शिंदे सेनेने बिघडवली आजी माजी आमदारांची गणिते
गेल्या पंधरा-वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी कधीही एकाच आमदाराला कायम ठेवण्याची परंपरा जतन केलेली नाही. त्यामुळे यावेळीही इथल्या मतदारांनी शिंदे सेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांना मताधिक्य देऊन निवडून आणले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील दोघांत चुरशीची लढत होण्याची चिन्हे होती. तथापी आयत्यावेळी शिंदे सेनेने राजेश मोरे रिंगणात उतरवून राजू पाटील आणि सुभाष भोईर यांची गणिते बिघडून टाकली. राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक असल्याने शिंदे पिता-पुत्रांनी त्यांना चांगलेच पाठबळ दिल्याची चर्चा होती.