ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे पुण्यात महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. 95 व्या वर्षी त्यांनी चकटफू योजना आणि संधीसाधू राजकारणाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. त्यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे. बाबा आढाव यांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या वयात त्यांनी आंदोलन पुकारल्याने सरकारला, नेत्यांना त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
1952 सालापासून मी प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार असे बाबा आढावा म्हणाले. पण यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत पैशाचा धुडगूस घातल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना सारख्या योजना निवडणुकीच्या तोंडावरच का आणल्या असा रोकडा सवाल त्यांनी केला. सरकाराने मतं मिळवण्यासाठी या तात्पुरता योजना आणल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना पेन्शन देण्याची बाजू त्यांनी उचलून धरली. आपण आता स्वस्थ बसणार नाही, आता आत्मक्लेश आंदोलन केले. यापुढे आणखी काहीतरी करण्याचा इशारा त्यांनी दिला.
हे सुद्धा वाचा
काँग्रेस, शरद पवारांवर टीका
राज्यात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप होत असल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. या आरोपात तथ्य असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी तांत्रिकदृष्ट्या आरोप सिद्ध करून दाखवावे, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने महिन्याला तीन हजार रुपये जाहीर करणे हे अतिशय लांछनास्पद आहे, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेस अदानींच्या विरोधात आहे. पण मग शरद पवारांचं काय? अदानीच्या पाठीशी उभी राहतात ही माणसं, असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या भूमिकांचा खरपूस समाचार घेतला.
सामूहिक सत्याग्रहाचा इशारा
ज्या काही योजना सुरु केल्या त्या योजना बंद करा आणि तरुण मुलांना रोजगार द्या, अशी मागणी त्यांनी केली. सरकार पक्षाचे चंद्रकांत पाटील माझ्या अंगावरून गेले ते भेटायला आले नाहीत. रोहित पवार काल भेटायला आले होते तेव्हा मी त्यांना आठवण करून दिली तुम्ही अदानींच्या गाडीत बसून फिरत होता. त्यांनी तो मुद्दा टाळला, असे ते म्हणाले.
आम जनतेने या आंदोलनाची दखल घ्यावी.माझं म्हणणं आहे घटनेचा राज्य निर्माण झालं पाहिजे. निकाल लागून एवढे दिवस झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होत नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सामूहिक सत्याग्रह करणार, असा इशारा आढाव यांनी दिला.