Published on
:
19 Nov 2024, 12:25 pm
Updated on
:
19 Nov 2024, 12:25 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : "काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकांचा लेखाजोखा या काळात घेणार आहे." असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या विधानावर कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
खा. धानोरकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा सोमवारी झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा धमकीवजा इशारा दिला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज जे लोक माझा विरोध करीत आहेत...
खासदार धानोरकर म्हणाल्या, ‘आज जे लोक माझा विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात 2800 गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे. फक्त 300 गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. 20 नोव्हेंबरला मतदान झाले की गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे,’ असा दमही त्यांनी दिला.
या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, सध्या ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.