कांदा लागवडीला वेगfile photo
Published on
:
20 Nov 2024, 10:32 am
Updated on
:
20 Nov 2024, 10:32 am
रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने शेतकरी कांदा लागवडीत मग्न आहेत. सध्या लागवडीसाठी मजूर मिळत नसले, तरी कुठूनही मजूर उपलब्ध करून कांदा लागवड शेतकरी करत आहेत. दिवसेंदिवस तालुकाही आता उसाबरोबरच कांदा आगार ओळखला जाऊ लागला आहे. कांद्याला भाव वाढल्याने शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. कांदा रोपांनाही भाव वाढला आहे.
परिसरात शेतकर्यांकडून बाजारात येणार्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात होत आलेली आहे. कांदा बाजारात प्रतिकिलो 40 ते 50 रुपये दराने विकला जातो. पण कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव असून, सध्या एकरभर कांदा लागवडीच्या रोपासाठी 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी ठरत असली, तरी कांदा लागवडीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे.
यंदा रोपांची मागणी वाढल्याने तालुक्यात 60 ते 70 टक्के कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. सध्या तालुक्यातील शेतकर्यांकडे उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात. अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून योग्य त्या बाजारभावाने विक्री करतात. परिसरात यंदा कित्येक शेतकर्यांचे टाकलेले रोप पाडक झाले, तर काही शेतकर्यांचा रोप चांगले उतरले. अवकाळी पावसाने रोप घालवल्याने ज्या शेतकर्यांचे कांदा रोप टिकले त्यांनी आपली लागवड उरकून दुसर्या शेतकर्यांना चांगल्या भावात मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची विक्री करत आहेत. काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपे विकत घेत असून, आपली लागवड उरकून घेत आहेत. बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात. कांद्याची टंचाई निर्माण होते तेव्हा भाव वाढतात. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांकडे कांदा नसल्यामुळेच सध्या कांद्याला भाव वाढला आहे. त्यामुळे कांद्याच्या रोपालाही सुगीचे दिवस आले आहेत. नोव्हेंबरअखेर कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. सध्या कांद्याला भाव असल्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकर्यांची कांदा लागवडीकडे लगबग सुरू आहे.
तालुक्यातील काही शेतकर्यांचे कांदा रोप अवकाळीने गेले, तरीही पुन्हा बियाणे घेऊन रोपे टाकली आहेत, तर काहींनी रोपेही पेरणी केली आहेत. तालुक्यात अनेक शेतकर्यांनी पेरणी करून कांदा लागवड केली आहे. सध्या रोपांचे वाढलेले भाव, मजुरीत झालेली वाढ, खत-औषधांचा वाढलेल्या दराचा मेळ बसत नसल्याने कांदा उत्पादन खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
आबासाहेब शिरसाठ, कांदा उत्पादक शेतकरी