विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्यामुळे पक्षात दोन गट पडले, तर दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पक्षात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती, तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, महाविकास आघाडीनं मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात जोरदार मुसंडी मारली होती. या दोन महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं अखेर निकाल हाती आला आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेला आकडा देखील महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला गाठता आलेला नाहीये. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपला राज्यात तब्बल 133 जागा मिळाल्या आहेत. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कोरोना काळात कुटुंब प्रमुखांप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र असं वागेल असं वाटत नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने मी महाराष्ट्राला मनापासून सांगितलं होतं. महाराष्ट्र असा वागेल असं काही वाटत नाही. काही तरी यात गडबड आहे. काही गोष्टी सेक्युलर असतात. बेकारी आहे, महागाई आहे. सर्वांनाच या गोष्टी सतावत असतात.
पहिली गोष्ट ही आहे की, अडीच वर्ष होऊनही न्यायालयातून निकाल मिळत नाही. त्या आधीच निवडणूक होते. आमच्या नावाचा, निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही. यातच गफलत आहे. मग विश्वास ठेवायचा कुणावर. अनाकलनीय आहे. अनपेक्षित आहे. हा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी मान्य करावाच लागतो. अमान्य आहे असं म्हणत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.