मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत File Photo
Published on
:
18 Nov 2024, 11:36 pm
Updated on
:
18 Nov 2024, 11:36 pm
पणजी : राज्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पोलिस महासंचालक अलोककुमार यांनी कुणालाही ’क्लीन चिट’ (निर्दोषत्व) दिलेली नाही. या प्रकरणात पोलिसांना तपासाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याने चौकशीअंती सत्य समोर येईलच, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पणजीत दिली.
सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने लोकांना लुटल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (दि. 16) पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत या प्रकरणांत राजकीय सहभाग असल्याचे समोर आले नाही, असे स्पष्ट केले होते. पोलिसांच्या या राजकीय व्यक्तींना देण्यात येणार्या ‘क्लीन चिट’वरून विरोधकांसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पोलिस महासंचालक आलोककुमार यांनी ‘क्लीन चिट’ हा शब्द कुठेच वापरलेला नाही. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. पोलिसांना तपासाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. चौकशी आणि तपासात सापडलेल्या दोषींना कठोरात कठोर कारवाई केली जाईल. चौकशी पूर्ण होऊ द्या, नंतरच यावर भाष्य करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज या प्रकरणातील दीपश्री सावंत-गावस हिला एका प्रकरणात जामीन मिळाला असून, श्रुती प्रभुगावकर हिचा जामीन फोंडा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकार्यांनी फेटाळला आहे.