Published on
:
29 Nov 2024, 1:23 pm
Updated on
:
29 Nov 2024, 1:23 pm
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्यासंदर्भात सूट दिल्या आहेत. एकीकडे वेळेत कर भरणा केल्यास सवलतींचा लाभ करदात्यांना निश्चितच होऊ शकतो. तथापी दुसरीकडे कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मात्र केडीएमसीने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. डोंबिवलीतील 8/ग प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या गोविंद पाटील यांच्या 5 दुकान गाळ्यांसह क्रिटीकल केअर सेंटरला थकबाकीमुळे सील करण्याची कारवाई करण्यात आली. 17 लाख 53 हजार 977 इतकी एकूण थकबाकी आहे .
डोंबिवली पूर्वेकडील 8/ग प्रभाग क्षेत्रात असलेल्या बिगर निवासी मालमत्तांना वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तथापि प्रतिसाद न देता दुर्लक्ष करून मालमत्ता कराचा भरणा करत नसल्याचे पाहून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले. कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 8/ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत आणि अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांच्या पथकाने थकबाकी पोटी असलेल्या मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई केली.
या कारवाईत डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली रोडला असलेले गोविंद पाटील यांचे 11 लाखं 37 हजार 234 रूपये इतक्या थकबाकीपोटी एकूण 5 दुकानी गाळे सिल करण्यात आले. तसेच मानपाडा रोडला असलेल्या लक्ष्मी निवासमधील क्रिटीकल केअर सेंटरवर 7 लाख 16 हजार 743 इतक्या थकबाकी पोटी सिल करण्याची कारवाई करण्यात आली.