केदार दिघेंवर मद्य आणि पैसे वाटप केल्याचा आरोप:शिंदे गटाच्या महिला पदाधिकारीच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल

3 days ago 2
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या एका महिला पदाधिकारीने दाखल केलेल्या तक्रारीवरून कोपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. केदार दिघे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दारू आणि पैसे वाटल्याचा आरोप त्या तक्रारीत करण्यात आला आहे. परंतु, हा आरोप खोटा असल्याचे केदार दिघे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱे ठाकरे गटाचे केदार दिघे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी वर्षा भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी यांनी संगनमतकरून सचिन गोरिवले यांच्या वाहनामध्ये मद्य आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली 26 पाकिटे ठेवली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून केदार दिघे यांच्यासह कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. केदार दिघे काय म्हणाले? केदार दिघे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे दिघे यांनी सांगितले. पोलिसांनी आमच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यांना काहीही सापडले नाही. वाहन तपासणीचे व्हिडिओ देखील आमच्याकडे आहे. माझ्या गाडीत काहीही सापडले नसताना मुद्दामहून मला टार्गेट केले जात असल्याचे केदार दिघे यांनी सांगितले. कोपरी पाचपाखाडीत पैशांचा महापूर आणणाऱ्या, साड्या वाटप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. पण माझ्या गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात काहीच सापडले नाही. त्याचा व्हिडिओ असतानाही जाणीवपूर्वक आज सकाळी माझ्यावर गुन्हा दाखल होतो, असा पलटवार केदार दिघे यांनी केला आहे. केदार दिघेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान ठाण्यातील कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षात फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. आनंद दिघे यांना 'ठाकरेंचे ठाकरे' म्हटले जायचे. त्यांच्या मृत्युला 21 वर्षे उलटली, तरी ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये त्यांचा आदर आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या होत्या. यानंतर महाराष्ट्रातील जनतेने ठाकरे गटालाच खरी शिवसेना मानले असल्याचे बोलले जात होते. आता विधानसभा निवडणुकीनंतर सामान्य मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा वारस कोणाला मानतो हे पूर्णपणे स्पष्ट होईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article