कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघात दोन शिंदेंमध्येच हायव्होल्टेज लढाई होत आहे. या मतदारसंघात 17 जण रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे यांच्यातच टफ फाईट होत आहे. प्रचारादरम्यान आ. महेश शिंदे यांनी विकासकामे तर आ. शशिकांत शिंदे यांनी दडपशाही या मुद्द्यांवर जोर दिल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आज दोन्ही उमेदवारांसाठी महत्वाचा दिवस असल्याने कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये 12 अपक्ष आहेत. या निवडणुकीत शिवसेनेकडून आ. महेश संभाजीराजे शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे, रासपचे उमेश चव्हाण, वंचितचे चंद्रकांत कांबळे, रिपब्लिकन सेनेचे संतोष भिसे निवडणूक रिंगणात आहे. तर अनिकेत खताळ, उध्दव कर्णे, तुषार मोतलिंग, दादासाहेब ओव्हाळ, महेश किसन शिंदे, महेश कांबळे, महेश सखाराम शिंदे, महेश संभाजीराव शिंदे, सदाशिव रसाळ, सचिन महाजन, सोमनाथ आवळे, संदीप साबळे हे अपक्ष उमेदवार आखाड्यात आहेत.
महेश शिंदेंनी मुख्यमंत्र्यांच्या सभेनेच आपला प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी प्रचारादरम्यान सर्व विकासकामांचा लेखाजोखा मतदार संघात मांडून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. तर आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कोरेगावात सभा घेतली. यावेळी त्यांनी दडपशाही व गुंडगिरीला उलथवून लावण्याचे आवाहन केले. तसेच आ. शशिकांत शिंदेंनी आ. महेश शिंदे यांच्यावर दडपशाहीचे आरोप करत रान पेटवले आहे. तर शशिकांत शिंदे नरेटिव्ह परसवत असल्याचा प्रचार आ. महेश शिंदे यांनी केला. आज मतदान होत असल्याने दोन्ही उमेदवारांकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीद्वारे काम केले जात आहे. आपल्या हक्काचे मतदान मिळावे, यासाठी नियोजन सुरू झाले आहे.