अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये स्थलांतरितांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोलंबियानं डिपोर्टेशनच्या विमानांना लँडिंगची परवानगी नाकारली. त्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी जाहीर केले की ते कोलंबियावर दंडात्मक शुल्क आकारणार आहेत तसेच प्रवास बंदीचा आदेश देण्यात येत आहेत.
यानुसार आता अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व कोलंबियन वस्तूंवर 25 टक्के शुल्क लादण्यात येते. ते आता दुप्पट म्हणजे 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. कोलंबियन सरकारी अधिकाऱ्यांवर प्रवास बंदी लादण्यात येईल, व्हिसा रद्द करण्यात येतील. आपत्कालीन ट्रेझरी, बँकिंग आणि आर्थिक निर्बंध यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे.
अमेरिकेच्या दोन डिपोर्टेशन विमानांना कोलंबियाने लँडिंगची परवानगी नाकारल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
अशा प्रकारची कारवाई ही फक्त सुरुवात असल्याचंही ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून म्हटलं आहे. ‘कोलंबियन सरकारला त्यांनी जबरदस्तीनं अमेरिकेत घुसवलेल्या गुन्हेगारांना स्वीकारणे आणि परत करणे यासंबंधीच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे उल्लंघन करण्याची परवानगी आम्ही देणार नाही’, असं स्पष्ट म्हटलं आहे.
दरम्यान, या आधी रविवारी, कोलंबियन अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले होते की, अमेरिकेतून हद्दपार केलेल्या स्थलांतरितांना ‘सन्मानाने’ परत पाठवले जाण्याचे नियम निश्चित करत नाही तोपर्यंत अमेरिकन डिपोर्टेशन विमानांना उतरण्याची परवानगी देणार नाहीत.
‘प्रवासी हे गुन्हेगार नाहीत आणि त्यांना मानवतेची वागणूक दिली गेली पाहिजे’, असं मत पेट्रो यांनी व्यक्त केलं. ‘म्हणूनच मी कोलंबियन स्थलांतरितांना घेऊन येणारी अमेरिकन लष्करी विमाने परत पाठवली’.
पेट्रो पुढे म्हणाले की आमच्या देशातील स्थलांतरितांना नागरी विमानातून पाठवले पाहिजे आणि गुन्हेगारांसारखी वागणूक न देता पाठवले पाहिजे, तर आम्ही त्यांचा स्वीकार करू.