कोल्हापुरात दहा मतदारसंघांतील 121 उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’ बंद होणार

3 days ago 1

कोल्हापूर ः मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची मंगळवारी सकाळी गर्दी झाली होती. (छाया ः मीलन मकानदार)

पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Nov 2024, 2:04 am

Updated on

20 Nov 2024, 2:04 am

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ‘बाजीगर’ कोण होणार, ते बुधवारी मतदान यंत्रांत बंद होईल. सर्व मतदारसंघांत चुरशीच्या लढती असून, चार मतदारसंघांतील बंडखोरीमुळे तेथे आघाडी व युतीअंतर्गत संघर्ष वाढला आहे. यातूनच हाणामारीचा प्रकार होऊन कोल्हापुरातील निवडणुकीला गालबोट लागले आहे. 121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने येथे राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नाही.

सुरुवातीला कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वाधिक चुरस होती. शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात काँग्रेसकडून मधुरिमाराजे यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र अखेरच्या क्षणी राजेश लाटकर या काँग्रेस बंडखोराने माघार न घेतल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि कोल्हापूर उत्तरमधून ‘हात’ हे चिन्ह मतदान यंत्रावरून पुसले गेले. नंतर लाटकर यांना काँग्रेसने पुरस्कृत केले; मात्र त्यांना काँग्रेसचे चिन्ह मिळाले नाही. क्षीरसागर दोनवेळा या मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. एकदा त्यांचा पराभव झाला होता. आता ते पुन्हा मतदारांचा कौल आजमावत आहेत. येथून दहा उमेदवार रिंगणात आहेत.

पाटील व महाडिक घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. येथे प्रचारात आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले होते.

मुश्रीफ-घाटगे संघर्ष टोकाला

राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये मुश्रीफ व घाटगे हे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. अजित पवार राष्ट्रवादीतून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ, तर शरद पवार राष्ट्रवादीतून महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे हे रिंगणात आहेत. दोघांच्या मागे सहकारातील ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे चुरस रंगली असून, हे दोघेही दुसर्‍यांदा समोरासमोर आले आहेत. मुश्रीफ विद्यमान आमदार व पालकमंत्री आहेत.

करवीरमध्ये पी. एन. पाटील यांच्या अकाली निधनाने त्यांचे चिरंजीव राहुल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्याविरुद्ध शिंदे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके उभे आहेत. काँग्रेसने मोठे नेते प्रचारात उतरवले, तर नरके यांच्या मागे शिंदे गटाची मोठी ताकद आहे. येथे जनुसराज्यचे संताजी घोरपडे यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीतच बंडखोरी झाली. त्यांच्यावर हल्ला झाल्याने येथील निवडणुकीला हाणामारीचे गालबोट लागले आहे.

‘चंदगड’ला महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी

चंदगडमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील लढत आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर, काँग्रेस बंडखोर विनायक पाटील, भाजप बंडखोर शिवाजी पाटील व जनसुराज्यचे बंडखोर मानसिंग खोराटे यांच्यात आहे. येथे महायुती व महाविकास आघाडी येथे दोन्हीकडे झालेली बंडखोरी थांबवण्यात संबंधित पक्षांच्या नेत्यांना अपयश आले आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘राधानगरी’त ए. वाय. पाटील यांच्या बंडखोरीचा फटका कोणाला?

राधानगरीत महायुतीतील उमेदवारीचा संघर्ष टाळण्यासाठी के. पी. पाटील यांना ठाकरे शिवसेनेत पाठवून नेत्यांनी एक संघर्ष थांबवला. त्यांचा सामना शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी होत आहे. के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी केली असून, त्याचा फायदा कोणाला होणार आणि ते नेमके कोणाची मते खाणार, यावर येथील निकाल अवलंबून असेल.

‘इचलकरंजी’त आवाडे-कारंडे चुरस

इचलकरंजीत राहुल आवाडे भाजपचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार मदन कारंडे यांच्याशी त्यांची लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून येथे इच्छुकांची संख्या खूप होती; मात्र बहुतेकांनी रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला, तर आपल्या मुलासाठी विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वतः थांबण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत चुरशीची लढत होत आहे.

‘शाहूवाडी’त जुने खेळाडू मैदानात

शाहूवाडीला जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे हे मतदारांचा कौल आजमावत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व कोरे यांच्यात लढत होत आहे. सरूडकर यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली होती. कोरे व सरूडकर यांनी थेट मतदारांशी संपर्क साधत प्रचार मोहीम राबविली. त्याचा फायदा कोणाला होणार, हे निवडणूक निकालात दिसेल.

शिरोळला गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर निवडून आले. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि ते पहिल्याच प्रयत्नात राज्यमंत्री झाले. आता ते राजर्षी शाहू विकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी आमदार उल्हास पाटील लढत आहेत. येथे तिरंगी लढतीचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला, हे निकालात स्पष्ट होईल.

‘हातकणंगले’मध्ये तिरंगी लढतीचा फटका कोणाला?

हातकणंगलेतून विद्यमान आमदार काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोक माने यांच्याशी लढत देत आहेत. राजू आवळे व अशोक माने दुसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. तिरंगी लढतीचा फटका कोणाला व फायदा कोणाला, हे आता स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article