Published on
:
21 Nov 2024, 1:21 am
Updated on
:
21 Nov 2024, 1:21 am
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने 65.51 टक्के मतदान झाले. शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. नवमतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेद्वारांमध्ये चुरस दिसून आली. सकाळपासून कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, सदर बाजार, कनाननगर, रमणमळा, जुना बुधवार पेठ, सोमवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. वृध्द मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांंकडून सोय करण्यात येत होती. महाविकास आघाडी व महायुतीच्या बूथवर कार्यकर्ते आपल्या पक्षाचे चिन्ह असणार्या टोप्या व स्कार्फ घालून फिरत होते. काही मतदान केंद्रावर उमेदवाराचा प्रचार करत असल्याची तक्रार झाल्यानंतर टोप्या व स्कार्फ काढण्यास सांगण्यात आले.
दुपारपर्यंत काही मतदान केंद्रावर 30 ते 32 टक्के मतदान झाले होते.मतदानाची टक्केवारी ज्या केंद्रावर कमी झाली होती, त्या मतदान केंद्रावर असणार्या मतदारांची माहिती घेऊन जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्यासाठी सांगितले जात होते. युवा मतदारांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठीचा उत्साह दिसून आला. काही नवमतदार एकत्रित येऊन मतदान केंद्राच्या बाहेर येऊन सेल्फी काढण्यात मग्न होते. काही संवेदनशील केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळ पाच वाजल्यानंतर काही मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.
राजारामपुरीसह परिसरात दुपारनंतर मतदानास वेग; 9 नंबर शाळेत सायंकाळनंतरही शंभरावर मतदार रांगेत राजारामपुरी, टाकाळा, यादवनगर उद्यमनगर परिसरात नागीरकांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदानास सकाळच्या सत्रात असणारा प्रतिसाद दुपारनंतर वाढला. अनेक मतदान केंद्रात दुपारनंतर रांगा लागल्या होत्या. दरम्यान शाळा नंबर नऊ, राजाराम विद्यालयातील खोली नंबर तीनमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर 83 मतदार रांगेत होते. या सर्व मतदारांना निवडणूक कर्मचार्यांनी चिठ्ठ्या देऊन मतदान करुन घेतले. त्यामुळे या मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
ताराराणा विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलसह अनेक इमारतीत मतदान केंद्रे हेाती. या मतदान केंद्रांवर सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे या मतदान केंद्रात सकाळीच गर्दी होती. शासकीय मुलांचे वसतिगृह, पोपटराव जगदाळे हॉल, शाळा नंबर राजाराम विद्यालय, तवन्नाप्पा पाटणे हायस्कुल, यादवनगर येथील जयराज विद्यालय, उद्यमनगरमधील आयर्वनि ख्रिश्चन हायस्कूल या मतदान केंद्रात सकाळी मतदारांची तुरळक हजेरी होती.
या सर्व मतदान केंद्रांवर दुपारनंतर मात्र मतदारांच्या रांगा लाागल्या होत्या. शासकीय मुलांचे वसतिगृह शाळा नंबर नऊ, राजरााम विद्यालय या मतदान केंद्रांवर सायंकाळी मतदारांची मोठी गर्दी झाली होती. नऊ नंबर शाळेत तर सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर 83 मतदार रांगेत होते. या सर्वाना नंबरच्या चिठ्ठ्या देउन या सर्वाचे मतदान करून घेण्यात आले. त्यामुळे या केंद्रांवर रात्री सातनंतरही मतदान सुरू होते. मतदान केंद्राच्या 200 मीटर बाहेर मतदान बूथवर दिवसभर कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. बुथवरील कार्यकर्त्यांना नाष्टा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
शिवाजी पेठ, दुधाळीत मतदानाला तरुणाईच्या रांगा
कोल्हापूरच्या निवडणुकीत उमेदवारापासून ज्येष्ठ नेत्यांचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कौल कोणाकडे हे शनिवारी स्पष्ट होईल, मात्र मतदानासाठी शिवाजी पेठ, दुधाळी, रंकाळा या परिसरातील केंद्रावर तरुण मतदारांचा उत्साह दिसत होत्या. केंद्रावर तरुणांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. दुधाळी, शिवाजी पेठ परिसरात दत्ताजीराव माने शाळा नं. 8, दुधाळी मैदान हॉल, मामा भोसले विद्यालय, खराडे कॉलेज या केंद्रावर सकाळी एक तासभर गर्दी कमी होती.
बावड्यात सरासरी 76 टक्के मतदान
कसबा बावडा - लाईन बाजार परिसरातून सरासरी 76 टक्के मतदान झाले आहे. एप्रिल 2022 व नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत कसबा बावडा, लाईन बाजार परिसरातून 72 टक्केच मतदान झाले होते. वाढलेले चार टक्के मतदान कोणाला विजयी गुलाल लावणार याची परिसरात उत्सुकता लागून राहिली आहे. कसबा बावडा - लाईन बाजार मध्ये एकूण 31434 मतदारांपैकी 23910 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कसबा बावडा लाईन बाजार येथील 31 मतदान केंद्रापैकी केंद्र क्र. 7 पांडुरंग उलपे हॉल येथे सर्वाधिक 84.21 टक्के मतदान झाले. तर केंद्र क्र. 31 भाऊसाहेब महागावकर विद्यालय खोली क्र. 1 चार नंबर फाटक या केंद्रावर सर्वात कमी 65.34 टक्के मतदान झाले. कसबा बावडा, लाइन बाजार परिसरातून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांच्या रिक्षा फिरत होता होत्या. सकाळी नऊच्या सुमारास आमदार सतेज पाटील, सौ. शांतादेवी पाटील यांनी नागरी सुविधा केंद्र, भाजी मंडई येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.