Published on
:
20 Nov 2024, 1:02 am
Updated on
:
20 Nov 2024, 1:02 am
कोल्हापूर : सुरुवातीला एकतर्फी वाटणार्या लढती शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या बनल्यामुळे रात्री काही गडबड होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात गस्त घालत अक्षरश: रात्र जागविली. गस्तीच्या गाडीला झुकांडी देत गल्लीच्या कोपर्याकोपर्यावर कार्यकर्ते पहारा देत असल्याचे चित्र मंगळवारी रात्री पाहावयास मिळाले. त्यामुळे मतदानापूर्वीची रात्र ऐन थंडीतही तापली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला होता. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी अक्षरश: पायाला भिंगरी बांधली होती. सकाळी बाहेर पडल्यानंतर रात्रीची परतण्याची वेळ नसायची. रात्रंदिवस प्रचार करून वातावरण निर्माण केले गेले. बुधवारी (दि. 20) मतदान असल्यामुळे सोमवारी प्रचाराची मुदत संपली आहे. उघड प्रचाराची मुदत संपल्यानंतरच बहुतांशी उमेदवारांचा खरा प्रचार सुरू होतो. शेवटच्या रात्री गडबड होऊ नये म्हणून वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी उमेदवार आणि त्यांची यंत्रणा करत असते.
मतदानाच्या आधीचे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. दोन, तीन आठवडे पायाला भिंगरी बांधून गावोगावी जात प्रचाराचे रान उठवत तयार केलेले वातावरण टिकविण्यासाठी या दोन दिवसांत परिश्रम घेतले जातात. त्यासाठी कुटुंबात जेवढे मतदार असतील, तेवढ्या स्लिपा ‘पाकिटातून’ पोहोच करण्याचा प्रयत्न केला जातो. ती यंत्रणा सोमवार रात्रीपासूनच कार्यरत झाली आहे. जेवणावळी तर सुरूच होत्या. काहींनी जेवणाची कुपन्स काढली होती. ओळखपत्राच्या स्लिपांच्या पाकिटाबरोबरच काही ठिकाणी मटण, चिकनही घरपोच करण्यात आल्याचे समजते. ज्या भागातील मतदारांच्या ‘तक्रारी’ येत होत्या त्यांची नाराजी तातडीने दूर करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबत होती.
मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री काही गडबड होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात रात्र जागून काढली. कोपर्याकोपर्यावर कार्यकर्ते बसले होते. एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. विरोधकांच्या म्होरक्यांना शेवटच्या क्षणी वाटेल ती किंमत मोजून शांत बसविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे किरकोळ प्रकारही घडले. दुसरीकडे बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी वाहने पाठविण्याचे काम रात्रभर सुरू होते.