कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होत आहे. शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त सकाळी रवाना करण्यात आला. शहरातील मतदान केंद्रांवर मंगळवारपासून बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता. (छाया : मिलन मकानदार)
Published on
:
20 Nov 2024, 2:33 am
Updated on
:
20 Nov 2024, 2:33 am
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान होत आहे. संवेदनक्षम आणि अतित्रासदायक ठरणार्या केंद्रांसह ठिकठिकाणी दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. हुल्लडबाजी करणार्या, दहशत माजविणार्या आणि मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखविणार्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 184 अधिकार्यांसह 7 हजार 111 पोलिस, गृहरक्षक जवान आणि 10 कंपन्यामधील जवान असा मोठा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज सकाळी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्याशी संपर्क साधून बंदोबस्तासह परिस्थितीचा आढावा घेतला. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील यांच्यासह पोलिस उपअधीक्षक व प्रभारी अधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. निवडणूक केंद्रातील अधिकार्यांशीही चर्चा केली.
मतदान प्रक्रिया शाततेत, विना अडथळा पार पाडण्यासाठी सुरक्षा पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांसह परिसरात गोंधळ, दहशत माजविणार्या आणि मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखविणार्या समाजकंटकांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रापर्यंत वाहनांना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणांशिवाय विविध कंपन्यांच्या जवानांचा फौजफाटाही प्रत्येक मतदान केंद्रावर सज्ज ठेवण्यात आला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या पोलिस रेकॉर्डवरील सराईतांच्या घरांचीही झडती घेण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत. शहर, जिल्ह्यातून तडिपार झालेल्या गुन्हेगारांच्या हालचालीवरही लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून संबंधितांना ताब्यात घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दहाही विधानसभा मतदारसंघांत चुरशीने निवडणूक होत आहे. कागल, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले, राधानगरी-भुदरगड, चंदगड, पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांतील हालचालीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.