बाबड्यात शिंदे- ठाकरे समर्थकांत वाद झाला.
Published on
:
21 Nov 2024, 1:38 am
Updated on
:
21 Nov 2024, 1:38 am
कसबा बावडा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कसबा बावड्यात दुपारी तीनच्या सुमारास महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी बलभीम विद्यालय केंद्राला भेट दिली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक यांच्यात वाद झाला. प्रकरण गंभीर वळण घेत असताना आमदार सतेज पाटील यांनी समयसूचकता दाखवत परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला.
दुपारी पंचमुखी चौकात (दत्त मंदिर रोड) शिंदे गट व ठाकरे गट यांच्या प्रमुख पदाधिकार्यांत वादावादी होऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. यावेळी काहींनी मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे समर्थक आक्रमक झाले होते. यातूनच क्षीरसागर यांची गाडी मार्गस्थ झाली. पण ही घटना कसबा बावडा परिसरात वार्यासारखी पसरली. मोठ्या संख्येने जमलेल्या महाविकास आघाडी समर्थकांनी मुख्य मार्गाने शिवसेना कार्यालयाकडे धाव घेतली. कवडे गल्ली कोपर्यावर क्षीरसागर आणि कदम गाडीतून खाली उतरले आणि बावड्यातील तरुणांनी राहुल माळी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा जाब विचारायला सुरू केली. तरुणांचा जमाव आक्रमक होत पुढे सरकत होता.
काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. गाडीतील सर्वांना मुख्य मार्गावरील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले. या प्रकारची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भगव्या चौकात कार्यकर्त्यांना घेऊन जात शांत राहण्याचे आवाहन केले. मी राहुलच्या पाठीशी भक्कमपणे आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशेब करू. पण अजून मतदान व्हावयाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. याच दरम्यान पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पर्यायी मार्गाने क्षीरसागर यांच्यासह समर्थकांची चारचाकी कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ केली.
दरम्यान, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानादरम्यान एका गटाच्या कार्यकर्त्याची संशयास्पद हालचाल सुरू होती, त्याला एका माजी नगरसेवकाने हटकले असता संबंधिताने त्या माजी नगरसेवकालाच धक्काबुक्की केली, यानंतर संबंधिताला केंद्राबाहेर घालवण्यात आले.
टाकाळा येथे लाटकर -क्षीरसागर समर्थकांत तणाव
कोल्हापूर : टाकाळा येथे लाटकर व क्षीरसागर समर्थकांत बघून घेण्याची भाषा झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. क्षीरसागर यांनी मतदारांना आमिष दाखविल्याची माहिती लाटकर समर्थकांना मिळाली. त्यानंतर लाटकर समर्थकांनी तेथे धाव घेतली. क्षीरसागर आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप अमित कदम यांनी केला. या प्रकाराने टाकाळा येथे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटविले. त्यामुळे टाकाळा येथे काही काळ तणाव निर्माण झाला.