कडेगाव तालुक्यातील शाळगाव-बोंबाळेवाडी औद्योगिक वसाहतीतील एका खत उत्पादन करणाऱ्या कारखान्यात विषारी वायूगळती झाल्याने दोन महिलांसह तिघे ठार, तर आठजण बाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांवर कराडमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, तीन रुग्ण अत्यवस्थ आहेत.
औद्योगिक वसाहतीमध्ये म्यानमार रासायनिक खत कारखाना असून, या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी उशिरा विषारी वायूची गळती झाली. यामध्ये राणी राजेंद्र उथळे (वय 40, रा. येतगाव) या महिलेचा उपचारादरम्यान रात्री, तर नीलम रेठरेकर (वय 45, रा. वांगरेठरे मसूर) आणि किशोर चापकर (वय 45, रा. बोंबाळेवाडी) या दोघांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
विषारी वायूची बाधा झाल्याने माधुरी पुजारी (वय 40), सायली पुजारी (वय 22), मारुती थोरात (सर्वजण रा. बोंबाळेवाडी), प्राजक्ता पोपट मुळीक, वरद पोपट मुळीक, शिवानी राहुल मुळीक, शुभम अर्जुन यादव (सर्व रा. शाळगाव) यांच्यावर कराडमधील सह्याद्री, श्री हॉस्पिटलसह अन्य खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. तर, रायगाव, शाळगाव व बोंबाळवाडी या परिसरातील 8 ते 10 नागरिकांनाही वायूगळतीचा त्रास होऊ लागल्याने स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
विषारी वायूगळतीने परिसरातील डोंबावस्ती, बारुखोल परिसरासह शाळगाव, बोंबाळेवाडी, रायगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वायूगळतीची सखोल चौकशीची मागणी करण्यात येत असून, या परिसरातील नागरिक मुखपट्टीचा वापर करून आपली दैनंदिन काम करीत आहेत.