खेड-आळंदीची जागा हिशेब चुकता करण्यासाठी घेतली: संजय राऊतPudhari
Published on
:
19 Nov 2024, 5:54 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:54 am
Sanjay Raut News: खेड-आळंदीचा आमदार गुंड प्रवृत्तीचा माणूस असून, असा माणूस विधानसभेमध्ये असणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. यामुळेच येथील आमदाराला घरी पाठविण्यासाठी व जुना हिशेब चुकता करण्यासाठी खेड-आळंदीची जागा आम्ही शरद पवार यांच्याकडून मागून घेतली, असे उबाठा गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी येथे सांगितले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे शिवसेना पक्षाची मुलूखमैदानी तोफ खासदार संजय राऊत यांची प्रचार सांगता सभा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते.
संजय राऊत यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा चाकण येथील मार्केट यार्ड येथे आपली सभा होते, त्या त्या वेळी विजय आपलाच होतो. या इतिहासाची या वेळी देखील पुनरावृत्ती होणार. चाकण ही शरद पवार यांची कृपा आहे. आज महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार हे गुजरातला घेऊन जात आहेत.
महाराष्ट्र व मराठी माणसाला भिकारी बनवण्याचे काम महायुती सरकारचे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला. महायुतीवाले विकासावर बोलत नाहीत, हिंदू-मुस्लिमवर बोलतात. ही राज्याची निवडणूक असताना हे लोक पाकिस्तानवर झेंडा लावण्याची भाषा करून लोकांची फसवणूक करत आहेत. दरम्यान, राज्य उद्ध्वस्त करण्याचे काम हे गुजरातचे दोन व्यापारी मोदी व शहा करत असल्याचा जाहीर आरोप देखील राऊत यांनी केला.
आदित्य ठाकरे यांचा बाबाजी काळे यांना फोन
चाकण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांची प्रचार सांगता सभा खरेतर उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार होती. परंतु, सभेसाठी ठाकरे येऊ शकले नाहीत. परंतु, बाबाजी काळे यांचे भाषण सुरू असताना भर सभेत आदित्य ठाकरे यांचा काळे यांना फोन आला. खेड तालुक्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना विजयानंतर मातोश्रीचे निमंत्रण त्यांनी या वेळी दिले.