Published on
:
19 Nov 2024, 11:48 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:48 pm
वॉशिंग्टन : डोक्याला खोबरेल तेल लावणे, हा भारतात दैनंदिन जीवनातील एक सर्वसामान्य भाग आहे. केसांच्या वाढीसाठी किंवा केस दाट होण्यासाठी खोबरेल तेल लावणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटत असते. मात्र, हेच खोबरेल तेल आहारात वापरले तर ते विषासारखेच ठरते, असा शोध हार्वर्डमधील एका प्राध्यापिकेने लावलेला आहे.
भारताच्या दक्षिण भागात मुख्यत: केरळमध्ये तर स्वयंपाकातही खोबरेल तेलात करण्याची पद्धत आहे. या तेलामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि वजन कमी करण्यासही मदत होते, असे म्हटले जाते. मात्र, हे तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे संशोधन या प्राध्यापिकेने केले आहे. करीन मिशेल असे या प्राध्यापिकेकेचे नाव असून, तिने आपला शोधनिबंध सादर केला आहे. शोधनिबंधाच्या भाषणादरम्यान तिने तीन वेळा खोबरेल तेल हे विषाप्रमाणे असते, असे म्हटले आहे. खोबरेल तेलाच्या वापरामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि हृदयरोग होण्याचीही शक्यता असते. खोबरेल तेलात स्निग्धतेचे प्रमाण हे कैक पटींनी जास्त असल्याने ते आरोग्यासाठी चांगले नसते. याबाबत मिशेल म्हणतात, आहारात सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी चांगले नाही; तर दुसरीकडे कधीतरी खोबरेल तेलाचा वापर करणे याला काही अडचण नाही, असेही त्या सांगतात.