Published on
:
23 Nov 2024, 11:45 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:45 am
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे हे १५ हजार ५०५ मतांनी विजयी झाले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांचा पराभव केला. शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री वेळदा ३ हजार ३३३९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
आज सकाळपासून गडचिरोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या ३ फेऱ्यांमध्ये भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे आघाडीवर होते. त्यानंतर चौथ्या फेरीपासून काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांनी आघाडी घेतली. पुन्हा सोळाव्या फेरीनंतर डॉ.मिलिंद नरोटे यांनी पुन्हा आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत ती कायम राखली. यामुळे डॉ.मिलिंद नरोटे यांचा विजय झाला. डॉ.नरोटे यांनी इव्हीएम मशिनमधून १लाख १५ हजार ७८७ आणि पोस्टल बॅलेटमधून ७५३ अशी एकूण १ लाख १६ हजार ५४० मते मिळाली. मनोहर पोरेटी यांना इव्हीएमची ९९ लाख ८४१ आणि पोस्टल बॅलेटची १ हजार १९४ अशी एकूण १ लाख १ हजार ३५ हजार मते मिळाली. यामुळे भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे यांचा १५ हजार ५०५ मतांनी विजय झाला. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून ढोल-ताशांच्या निनादात जल्लोष केला.
डॉ.मिलिंद नरोटे यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले. परंतु काँग्रेसमध्ये नियोजनाचा अभाव दिसला. काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात लक्ष न देता आरमोरीच्या वाऱ्या केल्या. शिवाय पोरेटी हे विजय वडेट्टीवार यांचे उमेदवार असल्याचे भासवून जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोरेटी यांना पराभवाचा सामना करावा लागला. पोरेटी यांनीसुद्धा काही प्रभाव नसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात प्रचाराची सूत्रे सोपविल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. डॉ.मिलिंद नरोटे यांना चामोर्शी तालुक्याने तारले, असे एकूण चित्र दिसले.