Published on
:
23 Nov 2024, 1:58 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:58 pm
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील ६४ उमेदवारांचा निकाल शनिवारी (ता. २३) घोषित करण्यात आला. यात जिल्ह्यातील चारही जागांवर महाविकास आघाडीला दणका देत महायुतीने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात १९, तिरोडा २१, गोंदिया १५ आणि आमगाव विधानसभा क्षेत्रात नऊ असे ६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. असे असले तरी, खरी लढत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये झाली. गोंदियात महायुतीचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात खरी लढत झाली. तिरोड्यात महायुतीचे भाजपचे उमेदवार विजय रहागंडाले व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्यात लढत होती.
अर्जुनी मोरगाव येथे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) उमेदवार राजकुमार बडोले, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड आणि अपक्ष म्हणून रिंगणात असलेले प्रहारचे डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्यात तिहेरी लढतीचे चित्र राहिल असे बोलले जात होते. मात्र, डॉ. चंद्रिकापुरे यांची जादू फार चालली नाही. या ठिकाणी दुहेरी लढत झाली. आमगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय पुराम, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम आणि अपक्ष उमेदवार शंकर मडावी यांच्यात लढल होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु, या मतदारसंघातही दुहेरी लढतीचे चित्र दिसले.
तथापि, चारही विधानसभा क्षेत्रात शनिवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे झाली. या ठिकाणी २३ फेºया झाल्या. तिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय तिरोडा येथे झाली. या ठिकाणी २२ फेºया झाल्या. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पॉलिटेक्निक कॉलेज फुलचूर पेठ गोंदिया येथे झाली. येथे २६ फेºया झाल्या, तर आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय देवरी येथे झाली. या ठिकाणी २३ फेºया झाल्या. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरवातीला पोस्टल मतमोजणी करण्यात आली. यात महायुतीने आघाडी घेतली. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरवात करण्यात आली. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात खरी लढत झाली. विनोद अग्रवाल यांनी नवव्या फेरीत २५ हजार ३१६ मतांची आघाडी घेतली होती. तिरोडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार विजय रहागंडाले यांनी हॅटट्रिक केली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रविकांत बोपचे यांना दुसºयादा पराभवाचा सामना करावा लागला. विजय रहागंडाले यांनी नवव्या फेरीत २१ हजार ८२६ मतांची आघाडी घेतली होती.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) उमेदवार राजकुमार बडोले यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड यांना पराभवाचे चटके देणे सुरू केले. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांची जादू विशेष चालली नाही. तेराव्या फेरीअखेर राजकुमार बडोले १५ हजार ३४५ मतांनी आघाडीवर होते.
आमगाव विधानसभा मतदारसंघ भाजपने पुन्हा काबीज केला आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय पुराम यांनी काँग्रेसचे नवखे उमेदवार राजकुमार पुराम यांचा पराभव केला आहे. संजय पुराम यांनी पंधराव्या फेरीत सुमारे ३२,१२२ हजारांची आघाडी घेतली होती.