Published on
:
20 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
20 Nov 2024, 1:00 am
दोडामार्ग ः घरात घुसून महिलेचा विनयभंग करत तिला ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 11.45 वा.च्या सुमारास घडली. याबाबत पीडित महिलेने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रेहान कमर लतिफ (वय 38) या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
संशयित रेहान लतीफ याने एका विवाहित महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन आपल्याशी लग्न करावे यासाठी तिच्या मनाविरुद्ध जवळीक साधली व फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. महिला आपल्या मेसेजचा रिप्लाय देत नाही, याचा राग ठेवून सोमवारी रात्री 11.45 वा.च्या सुमारास तो महिलेच्या घरात घुसला व तिच्या पतीस ढकलत अंगावर धावत गेला. एवढेच नव्हे, तर त्या महिलेचा विनयभंग करत तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तू माझ्याशी लग्न कसे करत नाहीस ते बघतो. तू मला ओळखले नाही. रेहान काय चीज आहे हे तुला दाखवतो ,असे म्हणत महिलेशी झोंबाझोंबी केली.
तसेच हाताच्या थापटाने मारहाण करून मारण्याची धमकी दिली. महिलेची मुलगी सोडविण्याकरिता गेली असता तिला बाजूला ढकलून दिले. याबाबत पीडित महिलेने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित रेहान लतीफवर भारतीय न्याय संहिता कलम 333, 131, 74, 75, 76, 115(2), 351 (2), ( 3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.