कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजयानंतर जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदाराचे औक्षण करण्यात येत होते. जेसीबीतील गुलालाची उधळण ओक्षणाच्या ताटावर झाल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत आमदारांसह काही महिला जखमी झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आमदार झाल्याने त्यांच्या विजयाप्रत्यर्थ वाटेत महिला औक्षण करण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी शिवाजी पाटील हे गाडीतून उतरले असता त्यांना महिलांकडून औक्षण सुरू असतानाच याचवेळी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली. गुलालामध्ये असलेल्या रासायनिक घटकांचा औक्षण करताना आगीशी संपर्क झाल्याने, हा आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्यासह काही महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.