Published on
:
23 Nov 2024, 9:56 am
Updated on
:
23 Nov 2024, 9:56 am
गडहिंग्लज : प्रवीण आजगेकर
चंदगड विधानसभा मतदारसंघात पाचही तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आल्याने या ठिकाणची निवडणूक नेमकी कोण जिंकणार, याबाबत मोठ्या चर्चा झाल्या होत्या. अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. मात्र या सगळ्याला छेद देत भाजपाचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी जायंट किलरची भूमिका घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान झाल्यावर जी आकडेमोड मांडली होती, त्याच्याही पुढे मतदानामध्ये आकडे दिसून आले.
महायुतीकडून राजेश पाटील, महाविकास आघाडीकडून नंदा बाभूळकर, भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील, काँग्रेसचे बंडखोर अप्पी पाटील यांच्यासह जनसुराज्यचे मानसिंग खोराटेही रिंगणात आले होते. चंदगडला जोरदार चुरस वाढली होती. राजेश पाटील व नंदा बाभूळकर यांनी मोठ्या सभा घेतल्या. शिवाजी पाटील यांनी एकाही मोठ्या नेत्याला न बोलविता स्वतःच सभा घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यामुळे मोठ्या सभांचा परिणाम केवळ चर्चेपुरता झाला. प्रत्यक्षात शिवाजी पाटील हे या ठिकाणी जायंट किलर ठरले.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आजरा तालुक्यातील कोळींद्रे जि. प. मतदारसंघाची मोजणी सुरु झाली. या मतदार संघातून राजेश पाटील यांना अधिक मताधिक्य मिळेल व त्यांच्या पाठोपाठ नंदा बाभूळकर राहतील व या ठिकाणी शिवाजी पाटील हे चौथ्या क्रमांकावर राहतील, असाच कयास बांधला होता. मात्र शिवाजी पाटील यांना पहिल्या याच मतदार संघातून वाढीव मताधिक्य मिळाले. यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. या ठिकाणी सुरु झालेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कमी झालीच नाही. उलट जस जसे पाटील यांच्या मतदारसंघाकडे मतमोजणी गेली तसे आघाडी मोठ्या प्रमाणात वाढत गेली.
शिवाजी पाटील हे भाजपचे बंडखोर म्हणून अपक्षरित्या रिंगणात आले असले तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू असल्याने विजयानंतर ते भाजपसोबतच राहणार आहेत. गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील भाजपची मोठी फळी त्यांच्यासोबत काम करत होती. साहजिकच भाजपचेही बळ त्यांना या निमित्ताने लाभले. मनसेच्या नागेश चौगुले, शिंदे गटाच्या अनिरुद्ध रेडेकर यांनी त्यांना पाठिंबा देत सहकार्य केले. शिवाजी पाटील यांचा विजय सुकर करण्यात त्यांनी पाच वर्षे केलेली विकासकामे तसेच चंदगड मतदार संघाशी जुळवून घेतलेली नाळ ही देखील कारणीभूत आहे.
चंदगडला तुल्यबळ पाच उमेदवार झाल्याने त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार कोठे पुढे असेल व कुठे मागे असेल, याचे आडाखे बांधले होते. गडहिंग्लज तालुक्यात राजेश पाटील व नंदा बाभूळकर यांना मते वाढतील तर चंदगडमध्ये राजेश पाटील व शिवाजी पाटील यांच्यात चुरस होईल, अशा चर्चा होत असताना शिवाजी पाटील यांनी मात्र कार्यकर्त्यांचे दावे फोल ठरवित सर्वच ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसून आले.