Published on
:
19 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:46 pm
पणजी : ‘चंदेरी दुनियेचा महाकुंभ’ मानला जाणारा बहुप्रतीक्षेत भारताचा 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा पडदा बुधवारी उघडणार आहे. दुपारी ‘बेटर मॅन’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होत असली तरी संध्याकाळी 5.30 वा. महोत्सवाचे उद्घाटन होईल. यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनकुमार वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल मुरूगण, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ईएसजी उपाध्यक्ष डिलायला लोबो यांच्यासह सिनेसृष्टीतील 40 हून अधिक पाहुणे या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील.
हा उद्घाटन सोहळा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात येईल. उद्घाटन सोहळ्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम होईल. महोत्सवासाठी यंदा पणजी, पर्वरी, मडगाव आणि फोंडा या चार शहरांमधून चित्रपटांचे प्रदर्शन होईल संपूर्ण महोत्सवात 14 विभागांतील सुमारे 270 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन रसिकांना मेजवानी देईल. आंतरराष्ट्रीय विभागात 81 देशांतील 180 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. प्रादेशिक चित्रपटांसाठी इफ्फी अनोखी व्यासपीठ आहे. हे अधोरेखित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय पॅनोरमा विभाग. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या बहुविध स्थानिक भाषांतील चित्रपटांतून या विभागाचे वैविध्य दिसून येते. यावर्षी या विभागासाठी निवड झालेल्या 25 फिचर चित्रपटांमध्ये 3 मराठी, 5 हिंदी, दोन कन्नड, एक तमिळ, दोन तेलुगु, एक गुजराती, तीन आसामी, चार मल्याळी, तीन बंगाली चित्रपटाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-फिचर विभागात सादर होणार्या 20 चित्रपटांपैकी एक मराठी, सात हिंदी, दोन तमिळ, एक बंगाली, एक हरियाणवी, एक गारो, एक पंजाबी, एक लडाखी, एक ओरिया, एक तमिळ, एक इंग्लिश, एक राजस्थानी आणि एक कोकणी चित्रपट आहे. निवड झालेले हे चित्रपट म्हणजे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची प्रतिकृती सादर करत, भारतात अस्तित्वात असलेल्या असंख्य कथाकथनाच्या परंपरांचा पुरावाच आहे.
या महोत्सवात स्थानिक आणि जागतिक चित्रपट उद्योगांचे एकत्रीकरण दिसून येत असल्याने या महोत्सवात सह-निर्माणाची बाजारपेठ या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मिश्रणाला बळकटी देते. सात देशांतील 21 फिचर चित्रपट आणि 8 वेब मालिकांची सहनिर्मिती बाजार विभागातील सादरीकरणासाठी अधिकृत निवड झाली असून यात मराठी, हिंदी, इंग्रजी, आसामी, तमिळ, मारवाडी, बंगाली, मल्याळी, पंजाबी, नेपाळी, पहाडी आणि कॅन्टोनीज या भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फी 2024 मधील चित्रपट बाजारातील वर्क-इन-प्रोग्रेस (डब्ल्यूआयपी) लॅब उपक्रमातून या उत्सवाची चित्रपट क्षेत्रातील नव्या प्रतिभांची जोपासना करण्याप्रती कटिबद्धता दिसते. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ बादी यांचा उमल (मराठी), त्रिवेणी राय यांचा शेप ऑफ मोमोज (नेपाळी), शक्तीधर बीर यांचा गांगशालिक (गांगशालिक- रिव्हर बर्ड) (बंगाली) मोहन कुमार वालासला यांचा येरा मांडरम (द रेड हिबिस्कस) (तेलुगु), रिधम जानवे यांचा काट्टी री राट्टी (हंटर्स मून) (गड्डी,नेपाळी), विवेक कुमार यांचा द गुड,द बॅड, द हंग्री (हिंदी) यांचा समावेश आहे. यापैकी पाच चित्रपट पदार्पणातील चित्रपट असून त्यातून युवा चित्रपट निर्मात्यांची अमर्याद क्षमता आणि अभिनव दृष्टी ठळकपणे दिसते.
चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती...
यंदा महोत्सवात विधू विनोद चोप्रा, ए. रहमान, विक्रांत मेसी, आर. माधवन, नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंग, नुसरत भरुचा, सानया मल्होत्रा, इलियाना डिक्रूझ, बोमन इराणी, पंकज कपूर, अपारशक्ती खुराना, मानसी पारेख, प्रतीक गांधी, सई ताम्हणकर, विष्णू मंचू, प्रभुदेवा, काजल अग्रवाल, सौरभ शुक्ला यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक इतर नामवंत मंडळीही सहभागी होणार आहेत.