चंद्रपुरात भाजपचे 5 तर काँग्रेसचा 1 उमदेवार विजयी झाले.
Published on
:
23 Nov 2024, 2:47 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:47 pm
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या पार पडलेल्या मतमोजणी मध्ये 6 पैकी भाजपाचे 5 तर काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, किर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार यांनी गड राखण्यात यश मिळविले आहे. भाजपचे 2 नवीन चेहरे करण देवतळे व देवराव भोंगळे यांना संधी मिळाली आहे.
20 नोव्हेंबरला पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (दि.23) शनिवारी सकाळी आठपासून राजूरा, चंद्रपूर,बल्लारपूर, वरोरा, चिमूर व ब्रम्हपुरी मतदान संघाच्या ठिकाणी पार पडली. चिमूर येथे काँग्रेसचे सतीश वारजुकर यांच्यासोबत झालेल्या चुरशीच्या लढाईत भाजपाचे किर्तीकुमार भांगडिया विजयी झाले. त्यांनी 9853 मतांनी हॅट्रीक साधली.राजूरा विधानसभेमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचे ॲड. वामनराव चटप व काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचा नवीन चेहरा देवराव भोंगळे यांनी धोटे व चटप यांना धोबीपछाड देत विजय खेचून आणला. बल्लारपूर येथे सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विजयी झाले आहे. त्यांनी काँग्रेसचे संतोष रावत यांचा दारून पराभव केला. काँग्रेसच्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांची बंडखोरी त्यांना भोवली आहे.
ब्रम्हपुरी येथे विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचे क्रिष्णा शहारे यांचा पराभव करून गड राखला आहे. भाजपाने येथे नवीन चेहरा म्हणून शहारे यांना संधी दिली होती. वरोरा येथे भाजपा व काँग्रेसमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु कॉग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे हे तिसऱ्या स्थानी राहिले. खरी लढत भाजपाचे करण देवतळे व उध्दव बाळासाहेब गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांच्यात झाली. भाजपाचा नवीन चेहरा असलेले करण देवतळे यांना संधी मिळाली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ऐनवेळेवर भाजपामध्ये गेलेले किशोर जोरगेवार यांची लढत काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांच्याशी झाली. त्यांनी प्रवीण पडवेकर यांचा दारून पराभव करत आपला गड कायम राखला.