Published on
:
20 Nov 2024, 7:31 am
Updated on
:
20 Nov 2024, 7:31 am
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली. दरम्यान, चिमूर शहरात भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद कन्याशाळा येथे आझाद वार्ड आणि नेहरू वार्डचे बुथ आहेत. मतदारांना मदत करण्याकरीता येथे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते याद्या घेऊन बसले आहेत. सकाळी भाजपाचे उमेदवार तथा आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे या ठिकाणी कार्यकर्त्यासह उपस्थित झाले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस स्टॉलजवळ पोहचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर होते.
आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरला जाण्यास सांगितल्यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांनाही समजावले. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निवळली. सध्या शांतता आहे. हा प्रकार मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडला.