Published on
:
19 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:46 pm
बीजिंग : चीनच्या झुरोंग रोव्हरकडून मिळालेल्या डेटानुसार या रोव्हरला मंगळाच्या उत्तर गोलार्धातील एके काळच्या समुद्राचा किनारा मिळालेला आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या उत्तर गोलार्धात समुद्राचे अस्तित्व होते अशी जी धारणा होती, तिला या संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे. चीनचे हे रोव्हर 2021 मध्ये मंगळावरील सर्वात मोठ्या व प्राचीन अशा विवरांपैकी एका विवरात उतरले होते. या विवराला ‘उटोपिया प्लॅनिटिया’ असे नाव देण्यात आले आहे. या रोव्हरने सभोवतालच्या जिऑलॉजीचा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत दोन किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. हे रोव्हर तेथील बर्फ किंवा पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे.
या रोव्हरवरील कॅमेरे आणि ग्राऊंड-पेनिट्रेटिंग रडारचा त्याच्या कामासाठी उपयोग होतो. तसेच मंगळाच्या कक्षेत फिरत असलेल्या सॅटेलाईटच्या रिमोट सेन्सिंग डाटाचीही जोड या संशोधनाला मिळते. या दोन्हीच्या एकत्रित अभ्यासातून हाँगकाँग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीतील बो वू यांनी हे संशोधन केले आहे. हे रोव्हर ज्याठिकाणी उतरले आहे त्याच्या भोवतालच्या परिसरात पाण्याशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये असल्याचे दिसून आले. त्यामध्ये शंकुच्या आकाराचे खड्डे, खळगे, गाळाचे प्रवाह तसेच चिखलाच्या ज्वालामुखीच्या रचना यांचा समावेश होतो. त्यावरून असे दिसते की, हा भाग एकेकाळी अस्तित्वात असलेल्या समुद्राच्या किनारपट्टीलगतचा आहे. संशोधनावरून हा समुद्र 3.68 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. ‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिथे पाण्याशी संबंधित अनेक खनिजेही आढळली आहेत. त्यामध्ये हायड्रेटेड सिलिकाचा समावेश होतो. असे खनिज समुद्राच्या तळाशी निर्माण होत होते. त्यानंतर हा समुद्र दहा हजार ते एक लाख वर्षे गोठून गेला. त्यानंतर तो कोरडा पडला.