Published on
:
27 Sep 2024, 7:45 pm
Updated on
:
27 Sep 2024, 7:45 pm
पैठण : सख्या भाऊ व पुतण्याने सहा -सात जणांच्या टोळक्यासह पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात येऊन कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर कुऱ्हाडीने व लोखंडी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. रावसाहेब आव्हाड (वय ५०) व अलका आव्हाड (वय ४८) अशी जखमी पती- पत्नींची नावे आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, पैठण पोलिस ठाण्याचे कर्मचारी रावसाहेब आव्हाड (. नवीन कावसन पैठण)हे पत्नीसह शुक्रवारी रात्री घरात एकत्र बसले होते. त्यावेळी त्यांचे सख्खे थोरले भाऊ बाळासाहेब आव्हाड व पुतण्या प्रतीक आव्हाड हे दोघे सात ते आठ जणांचे टोळके घेऊन घरात शिरले. रावसाहेब व त्यांची पत्नी अलका यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर लोखंडी गजाने व कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात रावसाहेब आव्हाड व त्यांची पत्नी अलका आव्हाड यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वर्मी घाव बसल्याने दोन्ही पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.
रावसाहेब आव्हाड व बाळासाहेब आव्हाड यांच्यात घरगुती कारणावरून वाद होता हा वाद इतका विकोपाला गेला यातूनच बाळासाहेब आव्हाड व पुतण्या प्रतीक आव्हाड याने आव्हाड दोघा पती- पत्नीवरप्राणघातक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागी पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचारी व त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली त्यानंतर दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले.