जम्मू-काश्मीर पुन्हा धगधगतंय

4 days ago 2

दहशतवाद्यांनी गर्दीच्या बाजारपेठेत ग्रेनेडने हल्ला. Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Nov 2024, 11:41 pm

Updated on

18 Nov 2024, 11:41 pm

अभय पटवर्धन, कर्नल (निवृत्त)

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत आहे. जोपर्यंत राज्यपाल राजवट होती, तोपर्यंत या केंद्रशासित प्रदेशात निवडून आलेले सरकार नसल्याचा आरोप तेथील राजकीय पक्ष करत असत. आता राज्यात निर्वाचित बहुमताचे सरकार असतानाही खोर्‍यात दहशतवादाच्या घटना कमी होत नाहीत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीनंतर एक मोठी दहशतवादी घटना घडली, ज्यामध्ये परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करण्यात आले. आता दहशतवाद्यांनी गर्दीच्या बाजारपेठेत ग्रेनेडने हल्ला करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर खोर्‍यात शांतता आणि विकासाकडे वाटचाल होण्याची अपेक्षा बाळगली जात असताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी मात्र त्यात खोडा घालण्याचे षड्यंत्र रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून हल्ल्यांचे प्रमाण वाढविले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान प्राणाची आहुती देत आहेत. किश्तवाड येथील चकमकीत लष्कराचे जेसीओ राकेशकुमार हुतात्मा झाले आणि तीन जवान जखमी झाले. एवढेच नाही तर परप्रांतांतील मजुरांना नागरिकांचे ‘टार्गेट किलिंग’ केले जात आहे. अर्थात या हल्ल्यांचा उद्देश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे केंद्रशासित राज्यात परप्रांतीयांच्या मजुरांमध्ये भीती निर्माण करणे आणि सुरक्षा दलांच्या असमान प्रतिसादाला चिथावणी देण्यासाठी कारस्थान रचणे. हे तंत्र संघर्षग्रस्त राज्यांत दहशतवाद्यांकडून नेहमीच वापरले जाते. खोर्‍याचे प्रशासन सांभाळणार्‍या नायब राज्यपालांच्या कार्यालयाने आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नवनिर्वाचित सरकारने काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना टार्गेट करताना स्थानिक समुदायाविरुद्ध दमनकारी भूमिका घेण्यास प्रवृत्त करणार्‍या दहशतवाद्यांच्या जाळ्यात जवान अडकणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. फुटिरतावादी नेत्यांसह काश्मीरच्या राजकीय नेत्यांनी नागरिकांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे आणि तसा संदेश दहशतवाद्यांना थारा देणार्‍या समाजकंटकांपर्यंत जाणे आवश्यक आहे.

काश्मीर खोर्‍यातून कलम 370 हटविल्यानंतर प्रदेशातील काही नागरिकांत नाराजी आहे, हे नाकारून चालणार नाही. पण या स्थितीने आतापर्यंत 1990 च्या दशकातील अराजकतेचे रूप धारण केले नाही. तत्कालीन काळात सर्वत्र दहशतवाद आणि दहशतवादच दिसत होता. आता राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासन दहशतवाद्यांत फाटाफूट करण्याचे तंत्र अंगीकारू शकते आणि त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. राज्याच्या सुरक्षा आढाव्याच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांच्या सुरक्षेचे वातावरण तयार करण्याचा उपक्रमही हाती घ्यायला हवा. दहशतवाद्यांत फूट पाडून त्यांना कोर्टासमोर आणण्यासाठी नागरिकांना राजी करणेही गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच किश्तवाड जिल्ह्याच्या वरच्या भागात दहशतवाद्यांनी आयएसआयच्या इशार्‍यावर दोन ग्रामरक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली. तत्पूर्वी दोन सुरक्षा रक्षकांचे अपहरण केले होते आणि त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधत त्यांची गोळ्या घालत हत्या केली. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित ‘काश्मीर टायगर्स’ने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत सुरक्षा दले किंवा परप्रांतीय मजुरांवर हल्ले करत दहशतवादी कायदा आणि सुव्यवस्थेला एकप्रकारे आव्हानच देत आहेत. प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन झाल्यानतंर अशा घटनांत वाढ झाली आहे. दहशतवादावर खोर्‍यात राजकारण केले जात असले तरी जम्मू-काश्मीरमधील जनतेला शांतता हवी आहे आणि त्यासाठी अजूनही ते आस लावून आहेत. परंतु ती प्रस्थापित न होऊ शकल्याने निर्माण होणारी निराशा हेच सतत होणार्‍या हल्ल्याचे कारण स्पष्ट करत आहे.

सातत्याने करण्यात येणार्‍या हल्ल्यांचा उद्देश हा राज्यातील पायाभूत सुविधा देणार्‍या प्रकल्पांत अडथळे आणत विकासाला ब्रेक लावणे हा आहे. त्याचवेळी अन्य राज्यांतून आलेल्या कामगारांची हत्या करून भारताच्या संघराज्य व्यवस्थेला धक्का देण्याचे सुनियोजित षड्यंत्र दहशतवाद्यांकडून पाकिस्तानात बसलेल्या आपल्या आकांच्या आदेशावरून सुरू आहे. या माध्यमातून अन्य राज्यांतील मजूर काश्मीरमध्ये काम करण्यासाठी येणार नाहीत, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून केला जात आहे. एकूणच दहशतवादी संघटनांकडून जम्मू-काश्मीरबाबत चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण देशात काश्मीरबाबत चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात सुरक्षा दले आणि गुप्तचर संघटना या दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्यासाठी प्रभावीपणे काम करत आहेत. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा सफाया केला जात आहे. दहशतवाद्यांच्या नव्या आणि जुन्या छुप्या सहकार्‍यांची ओळख पटविली जात आहे. आता हिवाळा सुरू झाल्याने पुढील तीन महिने दहशतवाद्यांविरोधातील लढाई निर्णायक स्थितीत असेल. जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. त्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे. सद्य:स्थितीत काश्मीरमध्ये 119 दहशतवादी सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article