दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी ऐन थंडीत चांगलीच तापली आहे. या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. निवडणूक रिंगणात उतरलेले भारतीय जनता पार्टीचे आ. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला होत असून आ. गोरे व माजी आमदार घार्गे यांची सत्वपरिक्षा आहे. आज होत असलेल्या मतदानात जनता कुणाला कौल देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दुरंगी लढतीच्या टक्करीमध्ये अन्य काही राजकीय पक्ष व काही अपक्ष उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
माण विधानसभा मतदारसंघात आ. जयकुमार गोरे व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यासह प्रसाद मल्हारराव ओंबास, अरविंद बापू पिसे, अर्जूनराव उत्तम भालेराव, इम्तीयाज जाफर नदाफ, दादासाहेब गणपत दोरगे, सनीदेव प्रभाकर खरात, इंजि.सत्यवान विजय ओंबासे, अजित दिनकर नलवडे, अजिनाथ लक्ष्मण केवटे, अमर शंकरराव घार्गे, जयदीप पांडूरंग भोसले, जितेंद्र गुलाब अवघडे, नानासो हरी यादव, नारायण तातोबा काळेल, प्रभाकर किसन देशमुख, बजरंग रामचंद्र पवार, बाळराजे रेवण विरकर, सोहम उर्फ सोमनाथ लक्ष्मण शिर्के व संदीप जनार्दन खरात यांनी देखील ऐन थंडीत चांगलेच राजकीय वातावरण तापवले आहे.
प्रचार काळात स्वत: जयकुमार गोरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत विरोधकांवर तोफ डागली. तर प्रभाकर घार्गे यांच्यासाठी खा. शरद पवार, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर यांच्यासह दिग्गजांच्या सभा झाल्या. प्रचाराचा धुरळा आता बसला असून आज मतदान होत आहे. मतदारराजा कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.