Published on
:
20 Nov 2024, 12:05 am
ओरोस : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांत 921 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायं. 6 वाजेपर्यंत मतदान होत आहे. कणकवली व कुडाळमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर सावंतवाडी मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी व दोन अपक्ष अशी चौरंगी लढत होत असून तिन्ही मतदारसंघांत 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
यासाठी जिल्ह्यात एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत 63.92 टक्केमतदान झाले होते. यावेळी टक्केवारीत वाढ होते की घट होते, हे चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. निवडणुकीची मतमोजणी शनिवार 23 नोव्हेंबरला होणार आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्यात, याद़ृष्टीने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस यंत्रणाही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. गेले 20 दिवस सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.आता लक्ष आहे आज होणा-या मतदानाकडे. यासाठी जिल्ह्यातील 921 मतदान केंद्रावर एकूण 4 हजार 303 कर्मचारी मंगळवारीच पोहोचले असून बुधवारी सकाळी 7 वा. पासून मतदानास सुरुवात होणार असून सायंकाळी 6 वाजता मतदान संपेल. प्रत्येक दोन तासानंतर प्रत्येक केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
सिंधुदुर्गात कणकवली-देवगड-वैभववाडी या मतदारसंघामध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघामध्ये 5 तर सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले मतदारसंघामध्ये 6 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. खरी लढत ही महायुती व महाविकास आघाडीमध्ये होत असून कुडाळ व कणकवली मतदारसंघामध्ये थेट सामना पहायला मिळणार आहे. तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने चौरंगी लढत होत आहे.तिन्ही मतदार संघात एकूण 17 उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमाविणार असून या सर्वांचे भवितव्य आज (बुधवारी) मतदान यंत्रात बंद होणार आहे.
मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडावे यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलिस होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 5 एसआरपी तुकड्या सज्ज आहेत. याशिवाय ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून पोलिस यंत्रणा सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असणार आहे. निवडणूकीसाठी 72 पोलिस अधिकारी, 1456 पोलिस, 879 होमगार्ड ठेवण्यात आले आहेत.
तिन्ही मतदार संघातील आमने-सामने उमेदवार
कणकवली विधानसभा - नितेश राणे (भाजपा), संदेश पारकर (उबाठा शिवसेना), गणेश माने (अपक्ष), बंदेन वाजखानी (अपक्ष), संदेश परकर (अपक्ष). कुडाळ विधानसभा - वैभव नाईक (उबाठा शिवसेना), निलेश राणे (शिदे शिवसेना), अनंतराज पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), रवींद्र कसालकर (अपक्ष), उत्वला येळावीकर (अपक्ष). सांवतवाडी विधानसभा-दीपक केसरकर (शिंदे शिवसेना), राजनतेली (उबाठा शिवसेना), विशाल परब (अपक्ष), अर्चना घारे (अपक्ष), दताराम गावकर (अपक्ष) सुनील पेडणेकर (अपक्ष) असे 17 उमेदवार रिंगणात आहेत.