इंग्लंडचा स्टार फलंदाज ज्यो रूट कारकिर्दीतील 150 वा कसोटी सामना खेळला. File Photo
Published on
:
29 Nov 2024, 8:26 am
Updated on
:
29 Nov 2024, 8:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्ध हॅगली ओव्हल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज ज्यो रूट आपल्या कारकिर्दीतील 150 वा कसोटी सामना खेळत आहे. परंतु, न्यूझीलंडचा गोलंदाज नॅथन स्मिथने चार चेंडूत त्याला शून्यावर बाद केले. त्यामुळे रूटने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC) सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांना मागे टाकत लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. रूट WTC मध्ये आठव्यांदा आणि एकूण कसोटी कारकिर्दीत 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
इंग्लंडचा महान क्रिकेटपटू ज्यो रूट याने 150 कसोटी सामने खेळणारा चौथा इंग्लिश खेळाडू आणि जगातील अकरावा खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ख्राइस्टचर्चमध्ये सुरू झालेली पहिली कसोटी रूटच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण मानली जात होती. परंतु, हा सामना त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला कारण पहिल्या डावात हा प्रमुख फलंदाज शून्यावर बाद झाला.
33 वर्षीय रूटने 12 हजार 754 कसोटी धावा 51.01 च्या सरासरीने केल्या होत्या, मात्र न्यूझीलंडच्या मध्यमगती गोलंदाज नॅथन स्मिथच्या चेंडूवर त्याला बाद व्हावे लागले. कव्हर्सवर फटका मारण्याचा प्रयत्न करताना, रूटच्या बॅटच्या आतील कडेला चेंडू लागून तो मांडीवर आदळला आणि नंतर स्टंपवर जाऊन लागला.
या प्रकारामुळे रूट एका दुर्दैवी क्लबचा भाग बनला, कारण तो 150 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह वॉ (2002 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शारजाहमध्ये) आणि रिकी पाँटिंग (2010 मध्ये इंग्लंडविरुद्ध अॅडलेडमध्ये) यांच्यानंतर स्थान मिळवले.
ख्राइस्टचर्चमधील त्याला निराशाजनक अनुभव आला. रूटची सध्याचा फॉर्म विलक्षण आहे. या वर्षी त्याने 55.75 च्या सरासरीने 1,338 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये पाच शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. आपल्या 12 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत रूटने 35 शतके केली आहेत, परंतु, शुक्रवारी तो 13व्यांदा शून्यावर बाद झाला.
150 कसोटी सामने खेळण्याचा रूटचा विक्रम त्याच्या खेळातील चिकाटी आणि सातत्य दर्शवतो. जरी हा महत्त्वाचा खेळ त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तरीही त्याच्या कारकिर्दीने इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट विश्वात मोलाचा वाटा उचलला आहे, हे नक्कीच अधोरेखित होते.