Published on
:
23 Nov 2024, 2:09 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:09 pm
नवी दिल्ली : Jharkhand Election Results : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. पुन्हा एकदा झारखंडच्या जनतेने झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि काँग्रेसच्या आघाडीला कौल दिला आहे. ८१ पैकी ५६ जागा इंडिया आघाडी तर २४ जागा एनडीएच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. झारखंडमध्ये बहुमतासाठी ४२ जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे झारखंडमध्ये इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंडिया आघाडीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झामुमोला सर्वात जास्त ३४ जागांवर विजय मिळाला असून, काँग्रेस १६, राष्ट्रीय जनता दल (राजद) ४, सीपीआयएमएल २ जागेवर विजय झाले आहेत. एनडीएमध्ये भाजपला २१, जदयू १, अजसयू पक्षाला १ आणि लोजपाला १ जागेवर विजय मिळाला आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहेट मतदारसंघातून, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन गांडेयमधून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी धनवाडमधून, भाजप नेते चंपई सोरेन सेराईकेला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजप नेत्या सीता सोरेन यांचा जामतारा मतदारसंघातून पराभव झाला असून काँग्रेसचे इरफान अन्सारी विजयी झाले आहेत. तर डुमरी मतदारसंघातून झामुमोच्या बेबी देवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिथे झालोक्रांमोचे जयराम महातो विजयी झाले आहेत.
हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार
इंडिया आघाडी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंडमध्ये निवडणूक लढली आहे. ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पुन्हा राज्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच जाणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची लोकप्रियता प्रचंड वाढलेली पाहायला मिळाली. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांनी जोरदार प्रचार केला. इंडिया आघाडीच्या विजयानंतर हेमंत सोरेन बोलताना म्हणाले की, कल्पना सोरेन ‘वन मॅन आर्मी’ आहेत. त्यामुळे कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले जाते की काय ? अशीही चर्चा आहे.