Published on
:
23 Nov 2024, 10:16 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:16 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या 'इंडिया' आघाडी सत्ता अबाधित ठेवताना दिसत आहे. राज्यातील सर्व ८१ जागांसाठीच्या मतमोजणीत सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा ३३ जागांवर आघाडीवर आहे. तर आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्ष अनुक्रमे १७ आणि पाच जागांवर आघाडीवर आहे.
सत्ता अबाधित ठेवण्यात यश
झारखंडमधील विधानसभेच्या सर्व ८१ जागांसाठी शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, इंडिया आघाडी राज्यात पुन्हा एकदा स्थापन करताना दिसत आहे. भाजप २१ जागांवर आघाडीवर आहे. ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, झारखंड डेमोक्रॅटिक रिव्होल्युशनरी फ्रंट, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट लेनिनिस्ट) आणि जनता दल (युनायटेड) यांचे उमेदवार प्रत्येकी एका जागेवर पुढे असून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
८१ सदस्य संख्या असणार्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. राज्यात मुख्य लढत भाजप (भारतीय जनता पार्टी) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (झारखंड मुक्ती मोर्चा) यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत होती. राज्यात १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. ८१ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात ३८ मतदारसंघात मतदान झाले होते. झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलास (आरजेडी) अनपेक्षित यश मिळाले आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत झामुमो आघाडी आणि आणि भाजप नेतृत्त्वाखालील एनडीए यांच्यात चुरशीची लढत झाली होती. झारखंड मुक्ती मोर्चाने 30 तर भाजपला २५ जागा मिळाल्या होता.