Published on
:
19 Nov 2024, 3:19 pm
Updated on
:
19 Nov 2024, 3:19 pm
नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३८ जागांवर बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस, झामुमो या प्रमुख पक्षांसह इतर पक्ष आणि अपक्ष असे एकूण ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांपैकी ४७२ पुरुष आणि ५५ महिला आणि १ तृतीयपंथी उमेदवार आहे. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी हे प्रमुख उमेदवार आहेत.
झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील विधानसभेच्या जागांमध्ये संथाल विभागातील १८, उत्तर छोटानागपूर विभागातील १८ आणि रांची जिल्ह्यातील २ मतदारसंघांचा समावेश आहे. यांपैकी २७ मतदारसंघ सर्वसाधारण, ३ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि ८ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. या टप्प्यात एकूण १४ हजार २१८ बूथपैकी २ हजार ४१४ शहरी आणि ११ हजार ८०४ ग्रामीण भागात आहेत. महिला संचालित बूथची संख्या २३९ आहे. यांपैकी नक्षलग्रस्त असलेल्या ३१ बुथवर सायंकाळी ४ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार
बरहेट - हेमंत सोरेन (झामुमो) विरुद्ध गमलीएल हेब्रम (भाजप)
नाला - रवींद्रनाथ महातो (झामुमो) विरुद्ध माधव चंद्र महतो (भाजप)
धनवार – बाबूलाल मरांडी (भाजप) विरुद्ध निजामुद्दीन अन्सारी (झामुमो)
गांडेय - कल्पना सोरेन (झामुमो) विरुद्ध मुनिया देवी (भाजप)
डुमरी - बेबी देवी (झामुमो) विरुद्ध जयराम महातो (जेएलकेएम)
जामतारा - सीता सोरेन (भाजप) विरुद्ध इरफान अन्सारी (काँग्रेस)
दुसऱ्या टप्प्यात भाजपचे ३३ उमेदवार रिंगणात आहेत. झामुमोने २० जागांवर, काँग्रेसने १३ जागांवर, अजसूने ५, माकपने ३ आणि राजदने २ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक झामुमोने १३ जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसने ८ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या.
चार राज्यांतील १५ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान
चार राज्यांतील १५ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठीही बुधवारी मतदान होणार आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील ९, पंजाबमधील ४, केरळमधील १ आणि उत्तराखंडमधील १ मतदारसंघाचा समावेश आहे.