मतदानासाठी यंत्रणा सज्ज Pudhari File Photo
Published on
:
19 Nov 2024, 7:59 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:59 am
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 72 लाख 29 हजार 339 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 19 कोटी 74 लाखांच्या रोकडीसह 32 कोटी 5 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून पुढील दोन दिवस कसून तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील 6 हजार 955 मतदान केंद्रावरील सर्व तयारी झाली असून 10 हजार 935 पोलिस आणि 24 केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्याही तैनात झाल्या आहेत. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मज्जाव करण्यात आला असून मतदारांनी आपले नाव तपासून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये 244 उमेदवार आपले नशीब आजमावत असून सर्वात जास्त 24 उमेदवार हे कल्याण पश्चिम मतदार संघात तर सर्वात कमी 7 उमेदवार हे भिवंडी ग्रामीणमध्ये आहेत. ठाणे, डोंबिवली, कोपरी पाचपाखाडी, शहापूर, मुरबाड 9 पर्यंत उमेदवार आहेत. सर्वाधिक 5 लाख 45 हजार मतदार हे ओवळा माजिवडा मतदार संघात असून सर्वात कमी 2 लाख 83 हजार 397 मतदार संख्या ही उल्हासनगर विधानसभा मतदार संघात आहे. जिल्ह्यात 38 लाख 45 हजार 42 पुरुष आणि 33 लाख 82 हजार 882 स्त्री मतदार असून 1 हजार 603 तृतीय पंथी मतदार आहेत. 56 हजार 976 मतदार हे 85 वर्षावरील असून 38 हजार 149 दिव्यांग मतदार आणि 1 लाख 72 हजार 981 हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली.
जिल्ह्यात 897 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला असून 3940 मतदारांनी पोस्टल मतदान केले आहे. जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पडावी याकरिता 6 हजार 955 मतदान केंद्र सज्ज असून गृहनिर्माण सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकही मतदान केंद्र हे संवेदनशील नाही. प्रत्येक मतदार संघात एक युवक, एक महिला आणि एक दिव्यांग कर्मचार्यांमार्फत मतदान केंद्र चालविला जाणार आहे. सर्वाधिक 518 मतदान केंद्र हे मुरबाड आणि 260 मतदान केंद्र हे उल्हासनगर मध्ये आहेत. मुबलक प्रमाणात वोटिंग मशीन उपलब्ध असून 30 हजार 868 निवडणूक कर्मचारी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रातील 5 हजार 378 मतदान केंद्र आणि ग्रामीण भागातील 659 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा असणार आहे.
32 कोटींची रोकड-दारू जप्त
विधानसभा निवडणुकीचची आचारसंहिता जाहीर होताच भरारी पथकाने केलेल्या कारवाईत 32 कोटी 50 लाखांची रोकड, दारू जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये 19 कोटी 74 लाख रुपयांची रोकड जप्त झाली असून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत रोकड अधिक जप्त करण्यात आली आहे. पुढील 48 तासात हे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भरारी पथकेही वाढविण्यात आलेली आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी सांगितले.