मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील गोल्डन नेस्ट परिसरात असलेले ठाकरे कलादालनाची रुपरेषाPudhari News network
Published on
:
27 Nov 2024, 8:09 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:09 am
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील गोल्डन नेस्ट परिसरात असलेले ठाकरे कलादालन हे लोकांसाठी खुले केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोल्डन नेस्ट परिसरातील आरक्षण क्रमांक 122ड वरील जागेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे अल्टिमेटम आ. प्रताप सरनाईक यांनी गेल्या ऑगस्टमध्ये पालिकेला देत अन्यथा आयुक्त दालनात उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर प्रशासनाने कलादानाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन सरनाईक यांना दिल्यानंतर त्याचे काम सुरू असतानाच 30 सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घाईने उरकण्यात आले. मात्र अद्यापही या कलादालनाचे काम पूर्ण झाले नसल्याने ते लोकांसाठी कधी खुले होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
भाईंदर पूर्वेच्या मौजे गोडदेव येथील आरक्षण क्रमांक 122ड वरील 4 हजार 580 चौरस मीटर जागेत ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाच्या प्रकल्पास पालिकेच्या 2020 मधील महासभेत ठराव मंजुर करण्यात आल्यानंतर त्याचे संकल्पचित्र तयार करण्यात आले.
पालिकेकडून हे कलादालन उभारण्याचा एकूण खर्च 38 कोटी इतका अंदाजित करण्यात आला. त्यावेळी पालिकेच्या अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद करण्यात आली. त्याचे भूमिपूजन 18 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कलादालनाचे काम संथगतीने सुरू राहिल्याने ते अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. हे कलादालन लवकरात लवकर पूर्ण होऊन ते लोकांसाठी खुले व्हावे, यासाठी सरनाईक हे सतत प्रयत्नशील असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील डिसेंबर 2023 मध्ये या कलादालनाच्या कामाची पाहणी करून त्याचा आढावा घेतला होता.
लोक कलादालनाच्या प्रतीक्षेत
31 ऑगस्टची डेडलाईन दिल्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या सरनाईक यांनी दिलेली डेडलाईन शेवटची असल्याचे स्पष्ट करीत त्याचे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास आयुक्त दालनात उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यानंतर प्रशासनाने कलादालनाच्या कामाला वेग देत ते 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यास सुरुवात केली असतानाच त्याचे लोकार्पण 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईने उरकण्यात आले. त्यावेळी देखील या कलादालनाचे काम सुरूच असल्याचे निदर्शनास आले होते. परिणामी लोकार्पणानंतरही हे कलादालन लोकांसाठी खुले करण्यात आले नसल्याने ते लोकांसाठी कधी खुले होणार, असा प्रश्न निवडणुकीनंतर उपस्थित होऊ लागला आहे.