Published on
:
19 Nov 2024, 1:14 pm
Updated on
:
19 Nov 2024, 1:14 pm
डोंबिवली : विधानसभा निवडणूक सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार रविवारपासूनच ड्राय-डेच्या अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अधिकृत परवानाधारी मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. अनेक मद्यपींनी गावठी दारूच्या अड्ड्यांवर धाव घेतली आहे. स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने असे 3 अड्डे शोधून टाकलेल्या धाडीत दारूचा साठा जप्त केला आहे.
सरमाडी दारूचे अड्डे शोधून मिळालेल्या तक्रारींप्रमाणे पोलिसांनी पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव, 27 गावांपैकी कोळेगावात गावठी आणि देशी दारूच्या अड्ड्यांवर धाडी टाकून मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन दारू विक्रेत्यांवर मानपाडा आणि विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Maharashtra assembly polls)
निवडणुकीच्या काळात झोपडपट्टीतील मतदारांना पैसै, ओल्या पार्ट्या, दारूचे आमिष दाखवून काही उमेदवारांच्या समर्थकांकडून अमिषे दाखविली जातात. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढविली आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे परिसराची टेहळणी केली जात आहे.
पश्चिम डोंबिवलीतील मोठागावच्या टेकडी परिसरात असलेल्या शिवमंदिराजवळच्या झाडाखाली एक जण सरमाडी दारूची विक्री करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार यु. जी. खंदारे, दीपक महाजन घटनास्थळी रवाना झाले. तेथे पिंटू तुकाराम भोईर हा एका ड्रममध्ये 15 लीटर सरमाडी (हातभट्टी) दारू विक्रीसाठी बसला होता. पथकाने त्याला पकडून ताब्यात घेतले. विनापरवाना बेकायदा मद्य विक्री केल्याच्या आरोपाखाली हवालदार गोरक्ष शेकडे यांच्या फिर्यादीवरून विष्णूनगर पोलिस ठाण्यात पिंटू भोईर याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला.(Maharashtra assembly polls)
दुसऱ्या घटनेत विष्णूनगर पोलिसांनी मोठागावातील शिवमंदिराच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर छापा टाकून गणेश संपत सहाने याच्याकडील सरमाडी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी हवालदार श्रीराम मिसाळ यांनी विनापरवाना दारू साठा करून विक्री केल्याच्या सरकारतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 27 गावांपैकी काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावातील हनुमान मंदिराजवळ छापा टाकून 20 लीटर सरमाडी दारूचा साठा जप्त केला. विनापरवानाही मद्य विक्री केल्याप्रकरणी हवालदार प्रशांत वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार राजेश ओमप्रकाश गुप्ता याच्या विरूध्द मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Maharashtra assembly polls)