Published on
:
19 Nov 2024, 11:34 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:34 pm
वॉशिंग्टन : कधी कधी नवे शोध लागण्याची प्रक्रियाही अनोखीच असते. पुर्डु विद्यापीठातील एका टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये 1931 मध्ये एक उल्का सापडली होती. आता एका नव्या संशोधनानुसार 74 कोटी 20 लाख वर्षांपूर्वीच्या मंगळावरील द्रवरूप पाण्याचे पुरावे या उल्केत दडलेले आहेत. दोन इंच म्हणजेच पाच सेंटिमीटरची ही चकचकीत उल्का याद़ृष्टीने आता महत्त्वाची ठरली आहे.
ही उल्का कुणाला सापडली होती व ती कुणी ड्रॉव्हरमध्ये ठेवली, हे माहिती नाही. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात सापडलेल्या या उल्केत मंगळाच्या वातावरणात असलेले वायू अडकलेले असल्याचे 1980 च्या दशकातील संशोधनात दिसून आले होते. ‘नासा’च्या वायकिंग लँडर्सने केलेल्या संशोधनाला अनुकूल अशी स्थिती या उल्केत होती. आता या उल्केच्या अभ्यासातून दिसले आहे की, या उल्केतील खनिजांची त्यांच्या निर्मिती अवस्थेत द्रवरूप पाण्याबरोबर प्रक्रिया झाली होती. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जिओकेमिकल पर्सेप्टिव्ज लेटर्स’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उल्केतील खनिजांची सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी निर्मिती झाल्याचेही आढळून आले. पुर्डु विद्यापीठातील प्लॅनेटरी सायन्सच्या संशोधिका मारिसा ट्रेम्बले यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, या उल्केतील खनिजांच्या निर्मितीच्या काळात मंगळाच्या पृष्ठभागावर द्रवरूप पाण्याचे अस्तित्व होते. किमान ते तेथील पर्माफ्रॉस्टमधील वितळलेल्या बर्फातून आलेले असावे, असेही म्हणता येऊ शकते. मंगळावर विशिष्ट कालावधीनंतर चुंबकीय घडामोडी घडतात. सध्याही तसे चक्र सुरूच आहे. अशा घडामोडींमुळेच पर्माफ्रॉस्टमधील बर्फही वितळला असावा.