हिंगोलीत शिंदे गट - भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समजते Pudhari File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:20 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:20 am
हिंगोली - शहरामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यामध्ये झालेल्या हाणामारीत चौघे जण जखमी झाले तर गोळीबार झाल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी तरुणासह चौघांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिंदे गट व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समजते.
हिंगोली, कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी निकालामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणीच्या पूर्वी काही तरुणांनी कयाधू अमृतधारा महादेव मंदिरात पूजा सुरु केली होती. त्यानंतर दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर एका जमावाने बळसोंड भागात जाऊन एका घरावर हल्ला केला. यामध्ये संजय चव्हाण जखमी झाले.
या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून यावेळी दोन गटात राडा झाला. यामध्ये तलवार व कत्तीने हाणामारी झाली. यामध्ये गोळीबार झाल्याने गौरव श्रीराम बांगर गंभीर जखमी झाला. याशिवाय स्वराज बांगर, करण बांगर, विशाल आठवले. लखन चौधरी यांना कत्ती व तलवार लागल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र गौरव याच्या पोटात गोळी लागल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. तर इतर चौघांनाही नांदेडला हलविण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे शहारातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून मिरवणूक, रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय एक डीजेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून शहरातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
शहरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, सोशल मीडियावर कोणीही अफवा व चुकीची माहिती पसरवू नये. चुकीची माहिती व अफवा पसरविणार्यांवर कारवाई केली करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.