बुधवारी मतदारांना तीन तास अडवून ठेवल्याने मिंधे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ‘आज तुझा मर्डर फिक्स आहे’, अशी उघड धमकीच त्यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना दिली. दरम्यान, आपण हे मारहाण होत असलेल्या कार्यकर्त्याला उद्देशून म्हणालो, अशी सारवासारव कांदे यांनी केली. या घटनेने दिवसभर मतदारसंघात तणाव होता.
नांदगावचे मिंधे गटाचे आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी अजित पवार गटाच्या छुप्या पाठिंब्यावर माजी खासदार समीर भुजबळ हे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. कांदे यांनी असंख्य मतदार त्यांच्या शैक्षणिक संस्थेजवळ आणले. ही वाहने अडवून भुजबळ यांनी आक्षेप घेतला, तब्बल तीन तास मतदारांना अडवून ठेवले. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप झाले. निवडणूक अधिकाऱयांनी खात्री केल्यानंतर मतदारांची सुटका करण्यात आली. यावेळी कांदे आणि भुजबळ समोरासमोर आले. ‘तुझा मर्डर फिक्स आहे’ अशी उघड धमकीच कांदे यांनी भुजबळ यांना दिली. ‘आपल्या कार्यकर्त्याला मारहाण केली जात होती, यात तो मरून जाईल, मर्डरची घटना होईल’ असे मी मारहाण करणाऱयांना सांगत होतो, समीर यांना मी धमकी दिलीच नाही’, अशी सारवासारव कांदे यांनी केली.
साकोऱयात समीर भुजबळांची गाडी अडविली
पैसे वाटपाच्या संशयावरून नांदगावच्या साकोरे गावात संतप्त ग्रामस्थांनी समीर भुजबळ समर्थकांची गाडी अडविली. मराठा महासंघाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांचे हे गाव आहे. पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यानंतर काहीही न मिळाल्याने तणाव निवळला.