अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी २०२५ रोजी शपथ घेणार आहेत.File Photo
Published on
:
30 Nov 2024, 6:59 am
Updated on
:
30 Nov 2024, 6:59 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वीच तुम्ही कोठेही असला तरी अमेरिकेत परत या, असे आवाहन करत अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी विद्यार्थ्यांनी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केल्या आहेत. हे आवाहन विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांसाठी असल्याचे मानले जात आहे. २०१७ मध्ये ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जारी केलेल्या प्रवास बंदी आदेशामुळे देशात तणाव निर्माण झाला होता, याचेही स्मरण विद्यापीठांच्या आवाहनामुळे झाले आहे.
प्रवासावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदग्रहणानंतर प्रशासनाकडून प्रवासी निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ट्रम्प यांच्या शपथविधी पूर्वीच अमेरिकेत परतावे, असे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला घेणार शपथ
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी २०२५ रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी ते अर्थव्यवस्था आणि स्थलांतरीतांच्या समस्यांवरील अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करतील, असेही मानले जात आहे.
अमेरिकेत विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत भारत अव्वल
अमेरिकेतील शैक्षणिक-सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील एकूण विदेशी विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे भारत आणि चीनमधील आहे. अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्या भारत आणि चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४ टक्यांहून अधिक आहे. २००९ नंतर अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भारतील विद्यार्थ्यांच्या संख्येत 23 टक्क्यांनी वाढ होऊन भारताने चीनला मागे अव्वल बनले आहे. 'ओपन डोअर्स 2024 रिपोर्ट ऑन इंटरनॅशनल एज्युकेशनल एक्सचेंज' मधील आकडेवारीनुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भारतातून अमेरिकेत जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ३१ हजार ६०२ इतकी होती. तर दुसर्या स्थानी चीन आहे.
ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी अमेरिकेत परत या
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील इंटरनॅशनल स्टुडंट ऑफिसचे सहयोगी डीन आणि संचालक डेव्हिड एलवेल यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "प्रत्येक निवडणुकीसह प्रशासनात बदल होतो. तेव्हा धोरणे , नियम आणि कायदे उच्च शिक्षण तसेच इमिग्रेशन आणि व्हिसाच्या स्थितीवर परिणाम करणारे बदल होऊ शकतात. त्यामुळे विदेशताील विद्यार्थ्यांना आगामी हिवाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे."
विदेशातील विद्यार्थ्यांनी प्रवासाचे नियोजन करावे
वेस्लेयन विद्यापीठाच्या कॉलेज वृत्तपत्राने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, "देशात पुन्हा प्रवेश करण्यात अडचण टाळण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे तुम्ही कोठेही असला तरी19 जानेवारी किंवा त्यापूर्वीच अमेरिकेमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित राहणे. येल युनिव्हर्सिटी ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि स्कॉलर्सच्या कार्यालयाने या महिन्याच्या सुरुवातीला इमिग्रेशन धोरणातील संभाव्य बदलांबद्दल विद्यार्थ्यांच्या भीतीचे निराकरण करण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. इतर संस्था देखील ट्रम्प प्रशासनाद्वारे लागू केलेल्या कोणत्याहीधोरणांना आव्हान देण्याची तयारी करत आहेत. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) चे विभाग प्रमख डेव्हिड एलवेल यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाच्या योजनांचे काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
ट्रम्प यांनी २०१७ मध्ये दिले होते 'प्रवेश बंदीचे आदेश
२०१७ मध्ये ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले. यानंतर पहिल्याच आठवड्या त्यांनी इराक, सीरिया, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या मुस्लिमबहुल देशांच्या नागरिकांना 90 दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती. या निर्णयावर अमेरिकेतील नागरी हक्क संघटनांनी संताप व्यक्त केला होता.